भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पुण्यात जम्बो कोविड सेंटरच्या कामात घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केलाय. तसेच याबाबत काही कागदपत्रे सादर करत कोविड सेंटरचा काम मिळालेली कंपनी आणि पीएमआरडीच्या अधिकाऱ्यांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. यावेळी सोमय्या यांनी या घोटाळ्याचा तपास ठाकरे सरकार करू शकत नाही, असं म्हणत त्यांनीच लोकांच्या जीवाशी खेळण्याचं पाप केल्याचा आरोप केला. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
किरीट सोमय्या म्हणाले, “ज्या कंपनीने फसवणूक केली, घोटाळा केला त्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दिली आहे. यात खोट्या कंपनीची कोणतीही कागदपत्रे न पाहता पीएमआरडीच्या अधिकाऱ्यांनी काम दिलं. त्यामुळे या अधिकाऱ्यांविरोधात देखील तक्रार आहे. पोलिसांनी स्पष्टपणे सांगितलं की, आम्ही या कागदपत्रांची तपासणी करू आणि वरिष्ठांशी बोलून कारवाई करू.”
“ठाकरे सरकारने लोकांच्या जीवाशी खेळण्याचं पाप केलं”
“या घोटाळ्याचा तपास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सरकार करू शकत नाही. त्यांनीच लोकांच्या जीवाशी खेळण्याचं पाप केलंय. म्हणून आम्ही नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथोरिटीला (NDMA) लेखी तक्रार केलीय. त्याचे प्रमुख पंतप्रधान असतात आणि मुख्यमंत्री देखील त्यात असतात,” असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.
“महापौर जगदीश मोहोळ हे देखील २ दिवसात याबाबत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेकडे तक्रार करणार आहेत. त्यांनी महाराष्ट्रात विशेष पथक पाठवावं अशी आमची मागणी आहे,” असंही सोमय्या यांनी नमूद केलं.
“घोटाळ्याचे कागदपत्रे शोधायला मला १२३ दिवस लागले”
किरीट सोमय्या म्हणाले, “या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रेच दिली जात नव्हती. ही कागदपत्रे शोधायला मला १२३ दिवस लागले. जवळपास २०० माहिती अधिकार कायद्याखाली अर्ज केले. ते गोलगोल फिरवत होते.”
हेही वाचा : “मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे, त्यांनी….”; किरीट सोमय्यांचा घणाघात
“याबाबत पीएमआरडीने नियुक्ती केली. त्यावर १० दिवसात पुणे मनपाने आक्षेप घेतल्याने लोकांचे जीव वाचले आहेत. जेव्हा वैद्यकीय आणीबाणी घोषित झाली तेव्हा सर्व अधिकार अधिकाऱ्यांकडे होते. चूक कोणीही केलेली असो, याची चौकशी करायला हवी,” अशी मागणी सोमय्यांनी केली.