पुणे : राज्य सरकारच्या कंत्राटी भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. उमेदवारांकडून पैसे उकळण्यात येत आहेत. या भ्रष्टाचाराचे पुरावे माझ्याकडे आहेत. या भ्रष्टाचाराचा मुंबईमध्ये त्याचा भंडाफोड करणार असल्याची माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. राज्यातील शाळा आणि दवाखान्यांचे खासगीकरण करण्याच्या सरकारच्या धोरणाचा विरोध करत असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमासाठी पुण्यात आलेल्या वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कंत्राटी भरतीमुळे आरक्षण धोक्यात आले आहे. बेरोजगारांची फौज राज्यात उभी राहणार आहे. त्यामुळे हा निर्णय तातडीने रद्द करण्याची मागणी आहे. सरकारच्या निर्णयाविरोधात चंद्रपुरात आंदोलन झाले. सरकारला युवकांच्या मतांची गरज नाही, असेच चित्र आहे. आगामी काळात हेच युवक सरकारला धडा शिकवतील, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.
हेही वाचा >>>मुख्यमंत्र्यांनी टोल विरोधातील याचिका मागे का घेतली? राज ठाकरेंच्या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले, ‘सेटलमेंट’…
पुणे आणि चंद्रपूर येथील लोकसभेच्या पोटनिवडणुकींमध्ये भाजपचा पराभव झाल्याने पोटनिवडणुका जाहीर होत नसल्याचे चित्र आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये छत्तीसगढ, राजस्थान, मध्यप्रदेशात भाजपशी थेट लढत असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
एसआयटीमार्फत चौकशी करावी
राज्यातील रुग्णालयांमध्ये रुग्णांचे मृत्युंचे प्रमाण वाढत असतांना, गुन्हेगारांनी ससून रूग्णालयात अड्डा बनवला आहे. गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या ९ गुन्हेगारांनी ससूनमध्ये ठिय्या मांडला आहे. या गुन्हेगारांमध्ये अंमली पदार्थांचा तस्कर होता. हे गुन्हेगार आरोग्यसेवेसाठी नाही, तर मजा मारण्यासाठी आणि व्यवसाय चालवण्यासाठी रुग्णालयात आहेत. राजकीय राजाश्रयाशिवाय हे शक्य नाही. त्यामुळे या प्रकाराची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली.