राजकारणात भ्रष्टाचार ही सध्या मोठी समस्या निर्माण झाली आहे. राजकारणात येणाऱ्यांमध्ये आपण सर्वशक्तिमान असल्याचा व आपल्याला कोणी काहीच करू शकत नसल्याचा अहंकार निर्माण होतो. त्यातूनच भ्रष्टाचाराची निर्मिती होते, असे मत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्त केले.
साधू वासवानी मिशनच्या वतीने जे. पी. वासवानी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सप्ताहात शुक्रवारी अडवाणी यांनी सहभाग घेतला. त्या वेळी ते बोलत होते. अडवाणी यांनी बहुतांश मनोगत  सिंधी भाषेतून व्यक्त केले. ते म्हणाले की, राजकारणामध्ये भ्रष्टाचाराबाबत मोठी चर्चा होते आहे. भ्रष्टाचार ही सध्याची मोठी समस्या झाली आहे. राजकारणात आलेल्या माणसामध्ये एक अहंकार निर्माण होत असतो व या अहंकारातून व्यक्तीत दोष निर्माण होत असतात. समाजाचा विकास साधायचा असल्यास प्रत्येकाने आपली प्रतिमा सुधारली पाहिजे.
अध्यात्माच्या माध्यमातून माणसामध्ये श्रेष्ठता निर्माण होते, असे सांगून ते म्हणाले की, अध्यात्मातून येणारी श्रेष्ठता माणसाला एका उंचीवर घेऊन जाते. समाज चांगला व सुखी होण्यासाठी अध्यात्माची गरज आहे. भारताचा जगभरात सर्वानी आदर करावा, असे वातावरण वासवानी यांच्यासारख्या आध्यात्मिक कार्यातून साकारू शकणार आहे. इतर क्षेत्रातील प्रगतीबरोबरच देशाला या क्षेत्रातील प्रगतीचीही गरज आहे. विद्यार्थ्यांमध्ये बुद्धय़ांकाबरोबरच अध्यात्माची समजही वाढवावी लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा