पुणे : पुणे शहरातील मेट्रोचा महत्त्वाचा टप्पा असलेल्या शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय ते स्वारगेट भुयारी मार्गाचे लोकार्पण,तर स्वारगेट ते कात्रज या विस्तारित भुयारी मार्गाचे भूमिपूजन कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी एस. पी. कॉलेजच्या मैदानावर होणार होते. मात्र पुणे शहरातील मुसळधार पाऊस झाल्याने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुणे दौरा रद्द करावा लागला होता. त्यानंतर मेट्रोचं काम पूर्ण झालं असेल तर उद्घाटनाची वाट न पाहता, मेट्रो सुरू करण्यात यावी. या मागणीसाठी दोन दिवसापूर्वी पुणे मेट्रो कार्यालय बाहेर महाविकास आघाडी नेत्यांकडून आंदोलन करण्यात आले होते.
तसेच या कार्यक्रमावरून मोठया प्रमाणावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळाले. त्यानंतर आज दुपारी १२ वाजता गणेश कला क्रिडा रंगमंच येथे शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय ते स्वारगेट भुयारी मार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑनलाईनच्या माध्यमातून करणार आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह राज्यातील मंत्री, आमदार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
आणखी वाचा-मेट्रो मार्गाच्या उद्घाटनानिमित्त महायुतीचे आज शक्तिप्रदर्शन
मात्र त्यापूर्वीच काँग्रेस पक्षाचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी उद्घाटन सोहळ्यावरून सत्ताधारी पक्षावर टीका केल्याचे पाहण्यास मिळाले असून ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातील मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटन आणि भूमिपूजन सोहळ्यास आजवर ६ वेळा आले आहे. त्यामुळे यापुढील काळात एकाच प्रकल्पाचे किती वेळा उदघाटन करायचे, याबाबत सर्व पक्षांनी मिळून आचारसंहिता तयार करण्याची वेळ आली आहे. तसेच दोन दिवसापूर्वी एस. पी कॉलेजच्या मैदानावर उदघाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र मुसळधार पावसामुळे तो कार्यक्रम होऊ शकला नाही. त्या कार्यक्रमासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. त्यानंतर आज गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन सोहोळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाला देखील लाखों रुपयांच्या जाहिराती आणि इतर खर्च हा कोट्यावधी रुपयांमध्ये जाणार आहे. या दोन्ही कार्यक्रमास सर्व सामान्य नागरिकांच्या करातील पैशांची उधळपट्टी करण्यात आली आहे. यामुळे सत्ताधारी पक्षाचा निषेध व्यक्त करत असल्याचे त्यांनी सांगितले.
आणखी वाचा-संतापजनक! बारामतीमधील ‘त्या’ दोन अल्पवयीन मुलींवर ११ जणांकडून लैंगिक अत्याचार
तसेच ते पुढे म्हणाले की, आजवर अनेक कार्यक्रम सोशल मीडियाच्या माध्यमांतून घेण्यात आले आहेत. त्यानुसार आजचा कार्यक्रम एखाद्या ऑफिसमध्ये घेण्याची गरज होती. मात्र या सत्ताधारी पक्षांने केले नाही. केवळ जाहिरातबाजी आणि आम्ही खूप मोठ केल्याच हे दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण या सत्ताधारी पक्षाला एक बाब सांगावी वाटते की, पुण्यातील मेट्रो धावण्या अगोदर काँग्रेस सरकारच्या कालावधीमध्ये दिल्लीत मेट्रो धावली. त्यावेळी काँग्रेस सरकारने एवढ्या मोठ्या प्रमाणात कधी ही खर्च केला नाही. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाचा खर्च सर्व सामान्य नागरिकांच्या करामधून न करता, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मानधनामधून घेतला पाहिजे अशी मागणी करीत आजच्या कार्यक्रमात उपस्थित राहणार नसल्याची भूमिका यावेळी त्यांनी मांडली.