‘कॉटनकिंग’. कॉटनच्या शर्टमधील पुणेरी ‘ब्रँड’. पुण्यात नळस्टॉपवर प्रथम सुरू झालेला हा ब्रँड राज्याच्या सर्व मुख्य बाजारपेठात स्थिरावला, इतर राज्यांमध्येही पोहोचला. ‘पुणेकर आणि व्यवसाय’ हे प्रसंगी उपहासात्मकरित्याच वापरले जाणारे समीकरण या ब्रँडने खोटे ठरवले.
‘कॉटनकिंग’चे संचालक प्रदीप मराठे हे मूळचे मिरजेचे. पण पुण्यात स्थायिक होऊन पुणेकरच झालेले. अनेक महाराष्ट्रीयन घरांमधील शिरस्त्यानुसार त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊन विपणनात एमबीए पूर्ण केले आणि ते रीतसर नोकरीस लागले. त्या काळी एमबीए करणारे विद्यार्थी कमी होते आणि मराठे यांच्या कौशल्यामुळे त्यांना नोकरीत उत्तम यश मिळत गेले. तरीही आपला स्वत:चा व्यवसाय असावा हे त्यांच्या डोक्यात आधीपासून घोळत होते. नोकरीत जम बसल्यानंतर व्यवसायाला पुरेसे भांडवल आपण उभे करू शकू असे त्यांना वाटू लागले खरे, पण एकदम नोकरी सोडून व्यवसायात पडायचे धाडस होत नव्हते. पण एक दिवस त्यांनी निश्चय केला, चाळिसावा वाढदिवस नोकरीत साजरा करायचा नाही, हे पक्के केले आणि त्याप्रमाणे चाळिसाव्या वाढदिवसाच्या तीन महिने आधी नोकरीचा राजीनामा दिला. व्यवसाय काय करावा हा आणखी महत्त्वाचा प्रश्न होता. मराठे यांचे विपणनाचे काम ‘रेफ्रिजरेशन’ आणि ‘एअर कंडिशनिंग’च्या क्षेत्रात होते. त्यामुळे त्यातील एखाद्या कंपनीची ‘डीलरशिप’ घेऊन स्वतंत्रपणे विपणनच सुरू करावे, असा त्यांचा विचार होता. यातील पुरवठादार आणि ग्राहक दोहोंची माहितीही त्यांना होती. पण त्यांनी वेगळा मार्ग चोखाळायचे ठरवले. तोच हा कॉटन शर्ट्सचा व्यवसाय.
पुरुषांच्या कॉटन शर्ट्सचा व्यवसाय करता येईल, ही कल्पना मराठे यांना स्वत:च्याच अनुभवातून सुचली. त्यांना स्वत:ला कॉटनचे कपडे आवडत, पण खरेदीस गेल्यावर दुकानांमध्ये फारसे वैविध्य मिळत नाही अशी त्यांची ग्राहक म्हणून तक्रार असे. मोठय़ा ‘ब्रँड’चा कपडा खरेदी करायचे म्हटले तर किमतीचा अडसर असे. आपल्यासारखे अनेक ग्राहक चांगल्या पर्यायाच्या शोधात असतील, हे त्यांना जाणवले आणि कपडय़ांच्या व्यवसायाची विशेष माहिती नसतानाही त्यांनी याच व्यवसायाची कल्पना निश्चित केली. यातून १९९६ मध्ये ‘कॉटन किंग’चा जन्म झाला. सुरुवातीला हा स्वतंत्र ब्रँड नव्हता. विविध ब्रँडचे कॉटनचे कपडे विकत घेऊन मराठे त्यांच्या दुकानात विक्रीस ठेवत. यात ग्राहकांना कॉटन शर्ट्सचे वैविध्य मिळू शकत होते, पण मुळात कपडा दुसऱ्या ब्रँडचा असल्यामुळे मराठेंना त्याच्या किमती स्वत:च्या मनाजोगत्या ठेवता येत नव्हत्या. मग ‘कॉटन किंग’ हा ब्रँड म्हणून सुरू करून त्याचे उत्पादन स्वत: करायचे ठरले. केवळ एका शिलाई मशीनवर १९९८ मध्ये शर्ट्सचे उत्पादन सुरू झाले. उत्पादनात कॉटन किंग २००४ पर्यंत स्वयंपूर्ण झाले होते. प्रथम त्यांनी फॉर्मल शर्ट बनवले. नंतर एकामागून एक कॅज्युअल शर्ट, टी शर्ट, ट्राऊझर आणि जीन्स हे कपडेही बनवण्यास सुरुवात केली.
पुण्यात नळस्टॉपपासून सुरू झालेल्या या ब्रँडची आता १२० दुकाने आहेत. २००४ मध्ये लक्ष्मी रस्त्यावर कॉटन किंगचे पहिले ‘फ्रँचायझी’ दुकान सुरू झाले. राज्यातील सर्व मोठय़ा बाजारांमध्ये हा ब्रँड आहेच शिवाय कर्नाटक आणि गोव्यातही तो पोहोचला आहे. पुढच्या टप्प्यात आंध्र आणि तेलंगणमध्ये प्रवेश करण्याचा त्यांचा मानस आहे. हे कपडे आधी नळस्टॉप येथे व नंतर कोथरूडमध्ये बनत होते. आता मात्र त्यांचा उत्पादन विभाग बारामतीत आहे.
व्यवसाय वाढवताना आपल्या उत्पादनाच्या बाजाराचा सखोल अभ्यास आणि आपल्या ब्रँडचे वेगळेपण (‘निश’) तयार करणे फार आवश्यक असल्याचे मराठे सांगतात. प्रत्येक ब्रँड सर्व ग्राहकांना आपला वाटत नसतो. प्रत्येक ब्रँडचे काहीतरी वैशिष्टय़ असते आणि त्यावर त्याचा ग्राहक ठरतो. शंभर टक्के कॉटनचे पुरुषांचे कपडे, या कपडय़ांमध्ये भरपूर वैविध्य आणि वाजवी दर ही तीन उद्दिष्ट त्यांनी ठरवली. त्यावरून मध्यम वर्ग आणि श्रीमंत वर्गातीलही ‘वस्तूची किंमत वसूल होणारा दर्जा हवा,’ असा आग्रह धरणारे ते आपले ग्राहक असे उत्तर त्यांना मिळाले. ‘कॉटनकिंग’चा ‘लोगो’ही पूर्वी वेगळा होता. येणारे ग्राहक साधारणत: चाळिशीच्या घरातले असल्यामुळे ती बाब लक्षात ठेवून सुरुवातीचा लोगो बनवण्यात आला होता. काळानुसार ग्राहकाचे वय कमी झाले. उत्तम पगार मिळवणारी तरुण मंडळीही कॉटनच्या कपडय़ांकडे वळू लागली आणि त्यामुळे ‘कॉटनकिंग’ने नवीन लोगोसह नवी ‘ब्रँड आयडेंटिटी’ तयार केली. आपल्या व्यवसायाच्या तंत्रात येणारी अद्ययावतता लगेच आत्मसात करणे हे मराठे यांनी कायम ठेवलेच, त्याच वेळी हा ब्रँड कधीही आपल्या मूळ संकल्पनेपासून दूर गेला नाही. केवळ भांडवल आले म्हणून मूळ उत्पादनापेक्षा पूर्णत: वेगळीच कुठली उत्पादने त्यांनी सुरू केली नाहीत.
कॉटनकिंगचे कपडे त्यांच्या संकेतस्थळावरही खरेदी करता येत असले तरी, कपडय़ांच्या ‘ऑनलाईन’ विक्रीसाठी हा ब्रँड तूर्त फारसा इच्छुक दिसत नाही. ऑनलाईन मार्केट अजून परिपक्व झालेले नाही, असे मराठे यांना वाटते. ‘ऑनलाईन विक्री प्रामुख्याने ‘डिस्काऊंट’च्या बळावर होत असते आणि आमचा डिस्काऊंट देण्यावर विश्वास नाही,’ असा त्यांचा पुणेरी बाणा आहे. ‘आमच्या उत्पादनाच्या किमती त्याच्या दर्जासाठी योग्य आहेत आणि त्या किमतीची विश्वासार्हता आम्हाला डिस्काऊंट देऊन घालवायची नाही,’ असे ते स्पष्टपणे सांगतात. पुणेकरांनी या ब्रँडला उचलून धरलेच आणि अनेक प्रसंगी शिकवलेही. एक महाराष्ट्रीयन माणूस कपडय़ाचा व्यवसाय करतो, याचे सुरुवातीला अनेकांना फार कौतुक वाटे आणि त्यापोटी पुण्यातील अनेक मोठय़ा मंडळींनीही कपडे खरेदीसाठी कॉटनकिंगला पसंती देणे सुरू केले.
पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रातील माणसाने आपल्या चाळिसाव्या वर्षी सुरू केलेला हा ब्रँड आता वीस वर्षांचा होतो आहे. महाराष्ट्रीयन आणि त्यातही पुणेकर आणि व्यवसाय हे प्रसंगी उपहासात्मकरित्याच वापरले जाणारे समीकरण कॉटनकिंगने खोटे ठरवले, इतकेच नव्हे तर इतर राज्यांमधील ग्राहकांनाही या शर्टाच्या प्रेमात पडायला भाग पाडले.
sampada.sovani@expressindia.com