पुणे : युद्धजन्य स्थितीत ५जी तंत्रज्ञानामुळे प्रतिसाद वेळ कमी होईल. जलद निर्णय प्रक्रियेमुळे भारतीय सैन्य येणाऱ्या काळात अधिक वेगवान होणार आहे, असे प्रतिपादन संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स ॲप्लिकेशन लॅबोरेटरीचे संचालक डॉ. एल. सी. मंगल यांनी मांडले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि उपकरणशास्त्र विभागातर्फे ‘मल्टिपल इनपुट मल्टिपल आऊटपुट तंत्रज्ञान आणि ५ जी कम्युनिकेशन’ या विषयावरील कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ‘सैन्यातील भविष्यातील संप्रेषण’ या विषयावर डॉ. मंगल बोलत होते. या कार्यशाळेचे उद्धाटन करण्यात आले. याप्रसंगी जेएटीसी-आयआयटी दिल्लीचे संचालक डॉ. एम. एच. रहमान, क्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आणि संशोधन (समीर) महासंचालक डॉ. पी. हनुमंता राव, एआरडीई पुणेचे समूह संचालक डॉ. बी. बी. पाधी, डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीचे अधिष्ठाता डीन डॉ. के. पी. रे, अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाचे संचालक डॉ. संजय ढोले या वेळी उपस्थित होते.
हेही वाचा – भिगवणजवळ भीषण अपघातात तिघांचा मृत्यू
विद्यापीठातील विविध विभागात मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. या संशोधनाचा फायदा देशाच्या विकासासाठी होणार असल्याचे डॉ. गोसावी यांनी यावेळी सांगितले. तर डॉ. मंगल म्हणाले, की भारतीय सैन्यात अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे. पुढील दहा वर्षांत ‘५जी नॉन टेरिटेरियल नेटवर्क’चा वापर करून सैन्याचे संपूर्ण संप्रेषण उपग्रहाद्वारे होईल. त्यामुळे नेटवर्कमधील अडथळे कमी होऊन जमिनीवरील स्वयंचलित (रोबोटिक) यंत्र, वाहने अधिक जलद गतीने हाताळता येणार आहे. मानवसहित आणि मानवरहित विमान, युद्धनौका, सबमरीन यांचे जमिनीवरील संप्रेषणाची गुणवत्ता वाढणार आहे. ‘५जी कस्टमायझेशन’ करून विशिष्ट नेटवर्क जॅम करणे, विशेष मोहिमेसाठी नेटवर्क वैयक्तिकृत करण्यासारखे उपक्रम राबवणे शक्य होणार आहे.