लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : गंभीर गुन्ह्यात शिक्षा सुनावलेल्या महिला कैद्यांसाठी देशातील पहिले खुले कारागृह येरवडा कारागृहाच्या आवारात साकारण्यात येणार आहे. गेले काही वर्षांपासून महिलांसाठी खुले कारागृह साकारण्याचा प्रस्ताव निधीअभावी रखडला होता. गृहविभागाने खुल्या कारागृहातील वसाहती बांधण्यास ११ कोटी रुपयांचा निधी नुकताच मंजूर केला आहे. निधी मंजूर झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तातडीने कारागृहातील पायाभूत सुविधा निर्मितीचे काम मार्गी लावण्यात येणार असून, वर्षभरात महिलांसाठी खुले कारागृह उभे राहील.
गंभीर गुन्ह्यात शिक्षा सुनावलेल्या कैद्यांची कारागृहात वर्तणूक विचारात घेऊन त्यांची रवानगी खुल्या कारागृहात करण्यात येते. खुले कारागृह संकल्पना कारागृहापेक्षा वेगळी आहे. कारागृहातील कैदी खुल्या कारागृहाच्या आवारातील जागेत शेती करतात. तेथे त्यांच्या वसाहती बांधल्या जातात. सकाळी नियमित हजेरी घेतली जाते. खुल्या कारागृहात बंदोबस्त नसतो. शिक्षा सुनावलेल्या कैद्यांना खुल्या कारागृहात ठेवण्यात येते. खुल्या कारागृहात रवानगी करण्यापूर्वी कैद्याची कारागृहातील वर्तणूक विचारात घेतली जाते, अशी माहिती कारागृहातील अधिकाऱ्यांनी दिली.
आणखी वाचा-पुणे : महात्मा गांधी रस्त्यावर सराफ व्यावसायिकावर कोयत्याने वार
येरवडा कारागृह देशातील सर्वात मोठे कारागृह म्हणून ओळखले जाते. येरवडा कारागृहाचा परिसर शेकडो एकरांवर आहे. महिलांसाठी स्वतंत्र कारागृह आहे. मात्र, महिलांसाठी खुले कारागृहाची सुविधा नव्हती. पुरुष कैद्यांसाठी खुले कारागृह आहे. येरवडा परिसरात महिलांसाठी खुले कारागृह बांधण्याची घोषणा तत्कालिन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केली होती. १५ ऑगस्ट २०१० रोजी खुल्या कारागृहाचे भूमिपूजन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर निधीअभावी या कारागृहाच्या आवारातील वसाहती बांधण्याचा प्रस्ताव रखडला होता. गृहविभागाने महिलांसाठी खुल्या कारागृहाच्या आवारातील पायाभूत सुविधांसाठी ११ कोटी रुपयांचा निधी नुकताच मंजूर केला. गृहविभागाने निधी मंजूर केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महिलांसाठीच्या खुल्या कारागृहातील वसाहती बांधण्याचे काम तातडीने सुरू करण्यात येईल. साधारणपणे वर्षभरात महिलांसाठी असलेले देशातील पहिले खुले कारागृह उभे करण्यात येईल, असे कारागृह अधिकाऱ्यांनी नमूद केले.
आणखी वाचा-टाकाऊ रेल्वे डब्यातून साकारले उपाहारगृह
खुले कारागृह म्हणजे काय?
जन्मठेपेसह गंभीर गुन्ह्यात शिक्षा सुनावलेल्या कैद्यांना खुल्या कारागृहात ठेवण्यात येते. येरवडा कारागृहात पुरुष कैद्यांसाठी खुले कारागृह आहे. खुल्या कारागृहात बराकी नसतात. शिक्षेचा कालावधी पूर्ण होईपर्यंत कैद्यांना भिंतीआड रहावे लागत नाही. खुल्या कारागृहात वसाहती असतात. तेथे शेती असते. तेथे फारसा बंदोबस्त नसतो. नियमित हजेरी देण्याशिवाय अन्य बंधने कैद्यांवर नसतात. खुल्या वातावरणात कैदी शेती करतात. शेतीत लागवड करणारा भाजीपाला कारागृहात पुरविण्यात येतो.
येरवडा कारागृहात ३०० महिला
येरवड्यातील महिला कारागृहात ३०० महिला आहेत. त्यातील बहुसंख्य महिला न्यायाधीन (कच्चे कैदी) आहेत. गंभीर गुन्ह्यात त्यांना अद्याप शिक्षा सुनावण्यात आली नाही. शिक्षा सुनावलेल्या ३० ते २५ महिला कारागृहात आहे. महिला कैद्यांसाठी शेती, तसेच विविध पारंपरिक व्यवसाय आहेत. तेथे खुले कारागृह सुरू करण्यात येणार आहे. येरवड्यात महिलांसाठी खुले कारागृह सुरू झाल्यानंतर देशातील किंबहुना आशिया खंडातील पहिले कारागृह ठरणार आहे.