शासनाने निर्धारित केलेल्या दिनांकानंतर तिसरे अपत्य झाल्याचे सिद्ध झाल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक पांडुरंग ऊर्फ बापू कांबळे यांची निवड येथील लघुवाद न्यायालयाने अवैध ठरवली आहे. या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करेपर्यंत आदेशाला स्थगिती देण्याचा कांबळे यांचा अर्जही न्यायालयाने फेटाळला आहे.
महापालिकेची सन २०१२ मध्ये झालेली निवडणूक कांबळे यांनी प्रभाग क्रमांक ६५ मधील अ जागेवरून लढवली होती व ते या जागेवर निवडून आले होते. त्यांचे पद रद्द करण्यासाठी काँग्रेसचे उमेदवार यासेर बागवे यांनी लघुवाद न्यायालयात अर्ज केला होता. कायद्यानुसार १२ सप्टेंबर २००१ नंतर तिसरे अपत्य झाले असल्यास उमेदवाराला निवडणूक लढवता येत नाही. या नियमानुसार कांबळे यांच्या निवडीला आव्हान देण्यात आले होते. कांबळे यांना १२ सप्टेंबर २००१ नंतर तिसरे अपत्य असल्याचा बागवे यांचा मुख्य आक्षेप होता.
या दाव्याच्या सुनावणीत न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच कागदपत्रेही तपासली. कांबळे यांनी तिसऱ्या अपत्याचा जो जन्मदाखला सादर केला होता तो न्यायालयाने ग्राह्य़ धरला नाही आणि त्यांची निवड अवैध ठरवली. दरम्यान, या निकालाच्या विरोधात वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले.

Story img Loader