पुणे : ससून रुग्णालयाच्या बँक खात्यातून तब्बल चार कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात तेरा आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी हा आदेश दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रुग्णालयाच्या वरिष्ठ सहायक रोखपाल सुलक्षणा चाबुकस्वार, कक्षसेवक नीलेश शिंदे, अधिपरिचारिका सुमन वालकोळी, अर्चना अलोटकर, वरिष्ठ लिपिक दीपक वालकोळी, संतोष जोगदंड, दयाराम कछोटिया, कनिष्ठ लिपिक श्रीकांत श्रेष्ठ, सेवानिवृत्त सीटी स्कॅन तंत्रज्ञ उत्तम जाधव, वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक संदीप खरात, तसेच अनिता शिंदे, शेखर कोलार, राखी शहा या व्यक्तींचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.

हेही वाचा… अहेरीत पिता-पुत्रीत थेट लढत; शरद पवार गटाकडून भाग्यश्री आत्राम यांना उमेदवारी

या प्रकरणी एकूण २५ जणांविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यांच्याविरोधात रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी गोरोबा आवटे यांनी तक्रार दिली आहे. रुग्णालयात अकाउंटंट म्हणून काम करणारे तत्कालीन प्रशासकीय अधिकारी अनिल माने आणि रोखपाल सुलक्षणा चाबुकस्वार यांनी रुग्णालयाच्या बँक ऑफ बडोदा खात्यातून चार कोटी १८ लाख ६२ हजार ९४२ रुपये काढून स्वतःसह अन्य आरोपींच्या खात्यावर जमा केले. हा प्रकार ३१ जुलै २०२३ ते २४ जानेवारी २०२४ या कालावधीत घडला आहे. रुग्णालयाच्या आर्थिक नोंदीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे ससून प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा…दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांची लूट! खासगी ट्रॅव्हल्सविरोधात तक्रारीसाठीचा क्रमांक बंद…

त्यानंतर तेरा आरोपींनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला. त्याला अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी विरोध केला. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून, आरोपींनी संगनमताने हा गुन्हा केला आहे. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे, रुग्णालयाच्या बँक खात्यातून अपहार केलेल्या रकमेचा आरोपींनी काय विनीयोग केला, त्यांनी ती रक्कम कोणाला दिली आहे का, या मुद्द्यांचा तपास करावयचा आहे. त्यासाठी आरोपींची कोठडीत चौकशी आवश्यक असून, आरोपींना अटकपूर्व जामीन मिळाल्यास तपासात अडथळे येण्याची शक्यता आहे, असा युक्तिवाद अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Court denied prearrest bail to thirteen accused in the sassoon hospital embezzlement case pune print news vvk 10 sud 02