डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला हिंदू जनजागृती समितीचा कार्यकर्ता डॉ. वीरेंद्र तावडे याच्या सीबीआय कोठडीत गुरुवारी २० जूनपर्यंत वाढ करण्यात आली. कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला गुरुवारी दुपारी पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले होते. तावडे तपासामध्ये सीबीआयच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करीत नसल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांना केला आणि त्याच्या सीबीआय कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयाने कोठडीत वाढ करण्याचा निर्णय दिला.
वाचा : दाभोलकर हत्याकांड : सीबीआय चौकशीत वीरेंद्र तावडेचा असहकार
डॉ. दाभोलकर यांच्या खूनप्रकरणाचा तावडे मुख्य सूत्रधार असल्याचा सीबीआयला संशय आहे. तावडे याची कसून चौकशी करण्यात येत आहे. मात्र, तावडे चौकशीत सहकार्य करत नाही तसेच विचारलेल्या प्रश्नांना नीट उत्तरे देत नाही, असे सीबीआयने म्हटले आहे. सीबीआयने पनवेल येथील सनातन संस्थेच्या आश्रमातून हार्डडिस्क जप्त केली आहे. तावडे आणि मडगाव बॉम्बस्फोटातील फरारी आरोपी सारंग अकोलकर यांच्यात ईमेलद्वारे संवाद झाला होता, असेही सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
वाचा : दाभोलकर खून प्रकरणात तावडेच मुख्य सूत्रधार?

Story img Loader