स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दाखल केलेल्या दाव्यात फौजदारी प्रक्रिया संहिता २०२ अन्वये सखोल तपास करून पोलिसांना २३ फेब्रुवारीपूर्वी तपास अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी तपास अहवाल वेळेत सादर न केल्याने न्यायालयाने पोलिसांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
हेही वाचा >>> “वहिनी, तुम्ही हे केले. पण, सांगितले नाही….”, बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या परिचयपत्रकाचे प्रकाशन
राहुल गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर भाषण केले होते. भाषणात गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावकरांविषयी वादग्रस्त विधान केले होते. सावरकर यांचे नातू सात्यकी यांनी राहुल गांधी यांच्याविरुद्ध शिवाजीनगर न्यायालयात मानहानी प्रकरणी फौजदारी दावा दाखल केला. याबाबत सात्यकी यांनी सर्व पुरावे आणि साक्षीदार न्यायालयात सादर केले होते. संबंधित पुरावे आणि साक्ष ग्राह्य धरले होते. या प्रकरणात सत्यता निदर्शनास आल्यानंतर तसेच आरोपी न्यायालयीन कक्षेच्या बाहेर वास्तव्यास असल्याने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी संबंधित पोलीस ठाण्याला फौजदारी प्रक्रिया संहिता २०२ अन्वये सखोल तपास करण्याचे आदेश दिले होते. विश्रामबाग पोलिसांनी याप्रकरणाचा सखोल तपास करून तपास अहवाल २३ फेब्रुवारीपूर्वी सादर करण्यात आदेशात म्हटले होते. पोलिसांनी तपास अहवाल ५ मार्चपर्यंत सादर न केल्याने पोलिसांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी २ एप्रिल रोजी होणार आहे, असे सात्यकी सावरकर यांचे वकील ॲड. संग्राम कोल्हटकर यांनी सांगितले.