पुणे : अभिनेते धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांनी मावळ तालुक्यात खरेदी केलेल्या जमिनीचे खरेदीखत रद्द करण्याच्या मागणीसाठी मूळ मालकाच्या नातवांनी केलेला दावा वडगाव मावळ न्यायालयातील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश राहुल शिंदे यांनी फेटाळून लावला. त्यामुळे दोघांनाही दिलासा मिळाला आहे.
वडगाव मावळ तालुक्यात धर्मेंद्र देओल, त्यांची पत्नी हेमामालिनी यांनी जमीन खरेदी केली होती. त्यांनी श्रीकांत खिरे यांच्याकडून ही जमीन खरेदी केली होती. १९८५ मध्ये खिरे यांनी या जमिनीची विक्री त्यांना केली होती. जमिनीच्या मूळ मालकाचे नातू किसन मानकर यांनी खरेदी केलेल्या जमिनीचे खरेदीखत रद्द करण्यात यावे, असा दावा वडगाव मावळ न्यायालयात केला होता. या खटल्यात धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांच्या वतीने ॲड. अमित राठी, ॲड. राजू शिंदे, ॲड. आदित्य जाधव यांनी बाजू मांडली. संबंधित दावा कालबाह्य असल्याचा अर्ज ॲड. राठी यांनी न्यायालयात दाखल केला. जमिनीच्या मूळ मालकांना १९८५ मध्ये जमिनीच्या खरेदीखताची माहिती होती. त्या वेळी त्यांनी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया अवलंबली नाही. आता ३७ वर्षांनंतर पैसे उकळण्यासाठी हा दावा दाखल करण्यात आला आहे, असे ॲड. राठी यांनी युक्तिवादात सांगितले.
हेही वाचा – मनोरमा खेडकर यांना जामीन मंजूर, मुळशी तालुक्यात जाण्यास न्यायालयाची मनाई
हेही वाचा – देशातील इथेनॉल उत्पादनक्षमता १५८९ कोटी लिटरवर
खिरे यांनी वसंत मानकर, शिवाजी मानकर आणि यमुनाबाई जांभूळकर यांच्याकडून १२ जून १९८५ रोजी जमीन खरेदी केली. संबंधित जमिनीचा आणखी एक विक्री करार खिरे यांच्या नावे करण्यात आला. त्यानंतर अभिनेत्यांनी खिरे यांच्याशी जमिनीचा खरेदी करार केला. त्यामुळे खिरे यांच्या नावे केलेले विक्रीपत्र बनावट आहे. खरेदीखत रद्द करण्यात यावे, असा युक्तिवाद मानकर यांच्या वकिलांनी केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांच्या बाजूने निकाल दिला.