पुणे : अनैतिक संबंधातून प्रियकराचा ओढणीने गळा आवळून खून करणाऱ्या प्रेयसीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी जन्मठेपेची शिक्षा आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तुलसी पप्पू बाबर (वय ३२, रा. चिखली) असे शिक्षा सुनावलेल्या महिलेचे नाव आहे. पैगंबर गुलाब मुजावर (वय ३५) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत पैगंबर मुजावर याच्या पत्नीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
मुजावर आणि तुलसी चिंचवड परिसरातील एका कपडे विक्री दालनात कामाला होते. मुजावर विवाहित होता. दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले. तुलसीने त्याच्याकडे विवाहासाठी तगादा लावला होता. त्याने विवाहास नकार दिल्याने तिने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. दोघांमधील अनैतिक संबंधाची कुणकुण मुजावरच्या पत्नीला लागली होती. या कारणावरुन मुजावरचे पत्नीशी भांडण झाले होते.
हेही वाचा : चाकण: करंट लागून आई आणि मुलाचा मृत्यू; मुलाला वाचवताना आई ही…!
चिंचवड येथील एका लाॅजवर १३ ऑगस्ट २०२१ रोजी तुलसीने मुजावरला बोलावून घेतले. तेथे त्यांच्यात वाद झाले. तुलसीने ओढणीने मुजावरचा गळा आवळून खून केला. सहायक पोलीस निरीक्षक गणेश लोंढे यांनी याप्रकरणाचा तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सरकार पक्षाकडून अतिरिक्त सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांनी बांजू मांडली. सरकार पक्षाकडून त्यांनी दहा साक्षीदारांची साक्ष नोंदविली. लाॅजवरील दोन कामगार, वस्त्र दालनातील कर्मचारी, तपास अधिकारी, पंचाची साक्ष या खटल्यात महत्त्वाची ठरली. साक्ष, तसेच पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी तुलसीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तिला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून दंड न भरल्यास सहा महिन्यांच्या अतिरिक्त कारावासाची तरतूद न्यायालयाने निकालपत्रात केली आहे. पिंपरी पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक अशोक कडलग, कर्मचारी बी. टी. भोसले यांनी न्यायालयीन कामकाजात सहाय्य केले.