पुणे : रस्त्यावर हाेणारे वादाचे प्रसंग टाळणे, अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या धर्तीवर पुणे पोलिसांनी वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली आहे. प्रशिक्षण सत्रात सहभाग झालेल्या पहिल्या तुकडीतील ६५ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
मुंबईच्या धर्तीवर पुणे पोलीस दलात वाहतूक शाखेत काम करणाऱ्या पोलिसांसाठी प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात येणार आहे. अद्याप या प्रशिक्षण संस्थेस जागा उपलब्ध झाली नाही. मुंबई पोलीस दलात वाहतूक शाखेत नियुक्ती हाेण्यापूर्वी पोलिसांना प्रशिक्षण देण्यात येते. पुण्यातही वाहतूक पोलिसांना प्रशिक्षण देण्यासाठी पोलीस दलांतर्गत संस्था सुरू करण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली असून, पहिल्या तुकडीतील पाच अधिकारी आणि ६० पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. पोलीस आयुक्तालयात मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते प्रशिक्षण पूर्ण केलेले अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त अमोल झेंडे यावेळी उपस्थित होते. साॅफ्ट स्किलच्या संचालक मंजिरी गाेखले, सुरेश गाेखले, उर्मिला दीक्षित, प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी अनिल पंतोजी, प्रकाश जाधव, अमित गोंजारी, निवृत्त सहायक पोलीस आयुक्त विजय पळसुले, सुरेंद्र देशमुख, पोलीस उपनिरीक्षक रघतवान, तसेच जहाँगीर रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांनी प्रशिक्षण वर्गात सहभागी झालेल्या वाहतूक पोलिसांना मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे वाहतूक शाखेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना वाहन कायदा, तंत्रज्ञान, इ-चलन यंत्राचा योग्य वापर, नागरिकांशी संवाद कौशल्य, अपघातग्रस्तांवर तातडीने करण्यात येणारे उपचार याबाबतची माहिती मिळाली आहे. वाहतूक नियमन करताना पोलिसांनी या प्रशिक्षण वर्गाचा उपयोग होणार आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.