लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : चुलत भावाने विश्वासाने घराची चावी ठेवण्यासाठी दिली. त्यानंतर भाऊ गावी गेला असता त्याच्या घरातून ३१ तोळे सोन्याचे दागिने चोरी केले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी भावाला २४ तासात अटक केली आहे. ही घटना ९ एप्रिल रोजी सकाळी मोशी येथे उघडकीस आली.
गंगाधर रावसाहेब तेलशिंगे (३८, मोशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी जगदीश महादेव तेलशिंगे (३९, मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगदीश आणि गंगाधर हे चुलत भाऊ आहेत. जगदीश यांनी त्यांच्या घराची चावी गंगाधर याच्याकडे विश्वासाने ठेवण्यासाठी दिली होती. दरम्यान जगदीश हे १९ फेब्रुवारी रोजी गावी गेले. ते गावाहून ९ एप्रिल रोजी परत आले असता त्यांच्या घरातून ३१ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट एकने जगदीश यांच्या सोसायटी मधील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यामध्ये अनोळखी व्यक्ती कोणीही घराजवळ आला नसल्याचे निदर्शनास आले. जगदीश यांनी चुलत भाऊ गंगाधर याला एक स्पेअर चावी ठेवण्यासाठी दिली असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिसांनी गंगाधर याचा शोध घेतला असता तो केएसबी चौकातील बीआरटी बस थांबा येथे संशयितपणे थांबला असताना आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्या शर्टाच्या आतील बाजूला सोन्याचे आणि चांदीचे दागिने आढळून आले. पोलिसांनी त्याच्याकडून २९ तोळे सोन्याचे आणि १६ तोळे चांदीचे दागिने असा एकूण १६ लाख ९२ हजार ३०० रुपयांचा ऐवज जप्त केला. त्याच्याकडे दागिन्यांबाबत विचारपूस केली असता त्याने हे दागिने चोरी केल्याचे सांगितले. त्याला अटक करून एमआयडीसी भोसरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.