पुणे : पुणे विमानतळावरील ‘पार्किंग बे’मध्ये एअर इंडियाचे अपघातग्रस्त विमान एक महिन्यांपासून उभे आहे. या विमानामुळे विमानतळावरील सेवेत अडचणी येत आहेत. अनेक उड्डाणांना विलंब होत असल्याने हवाई प्रवाशांचे हाल होत आहेत. हे विमान तेथून हटविण्यास आणखी २५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. दरम्यान, हे विमान तात्पुरते संरक्षण मंत्रालयाच्या जागेत हलवावे, यासाठी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पाठपुरावा सुरू केला आहे.
पुणे विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाचा १६ मे रोजी अपघात घडला होता. हे विमान धावपट्टीकडे नेले जात असताना लगेज ट्रॅक्टर ट्रॉलीची त्याला धडक बसली होती. यात विमानाचे नुकसान झाले होते. त्यावेळी विमानात सुमारे दोनशे प्रवासी होते. या अपघातानंतर प्रवाशांना पर्यायी विमानाने रवाना करण्यात आले. तेव्हापासून हे विमान विमानतळाच्या ‘पार्किंग बे’मध्ये उभे आहे. या विमानामुळे इतर विमानांच्या उड्डाणांमध्ये अडचणी निर्माण होत आहेत. विमानांच्या उड्डाणांना विलंब होत असल्याने प्रवाशांना अनेक तास विमानतळावर ताटकळत थांबावे लागत आहे.
हेही वाचा…शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचा एल्गार; फुलेवाडा ते विधानभवन मार्गावर पायी फेरी
याबाबत केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, पुणे विमानतळावरील सेवेला पार्किंग बेमधील विमानाचा फटका बसला आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने या विमानाच्या दुरुस्तीला परवानगी दिली आहे. याचबरोबर या विमानाची तपासणी करण्यासाठी तांत्रिक पथकही दाखल झाले आहे. सध्या या विमानाची दुरुस्ती सुरू झाली आहे. ही प्रक्रिया पुढील २५ दिवस चालणार आहे. त्यामुळे संरक्षण मंत्रालयाच्या जागेत हे विमान हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पुणे विमानतळावरील पार्किंग बेमधील एअर इंडियाचे अपघातग्रस्त विमान संरक्षण मंत्रालयाच्या जागेत हलविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याबाबत संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांना पत्र पाठविले असून, दिल्लीत गेल्यानंतर त्यांची भेटही घेणार आहे. हे विमान तेथून हटविल्यास इतर विमानांच्या उड्डाणांना होणारा विलंब कमी होईल. – मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री, नागरी हवाई वाहतूक
© The Indian Express (P) Ltd