लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी: पोलीस आयुक्तालयाअंतर्गत गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी तसेच पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी आता आणखी एका परिमंडळाची निर्मिती करण्यात आली आहे. राज्याच्या गृह विभागाने आणखी एक परिमंडळ आणि चार अतिरिक्त विभागांना सोमवारी मान्यता दिली. त्यानुसार, परिमंडळ उपायुक्त तसेच विभागीय सहायक पोलीस आयुक्त यांच्या कार्यक्षेत्राची पुन:र्रचना निश्चित करण्यात आली असून परिमंडळ तीनच्या पोलीस उपायुक्तपदी संदीप डोईफोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शहरासाठी १५ ऑगस्ट २०१८ रोजी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर दोन परिमंडळ निर्माण करण्यात आले. सध्या उपायुक्त विवेक पाटील आणि डॉ. काकासाहेब डोळे यांच्याकडे परिमंडळ एक आणि दोनची जबाबदारी आहे. तर, स्वप्ना गोरे यांच्याकडे गुन्हे शाखेसह मुख्यालय, प्रशासनाची जबाबदारी आहे. संदीप डोईफोडे आणि शिवाजी पवार या दोघांची नव्याने पोलीस उपायुक्त म्हणून पिंपरी – चिंचवड शहरात १८ ऑगस्ट रोजी बदली झाली. मात्र, त्यांच्याकडे कोणताच पदभार देण्यात आला नव्हता. सन २०१८ मध्ये पिंपरी – चिंचवड आयुक्तालयाची निर्मिती करताना शासनाने आयुक्तालयाकरीता दोन परिमंडळे आणि ४ विभागांना मान्यता दिली होती. परंतु, वाढती लोकसंख्या, नागरिकरण, औद्योगिकीकरण, शैक्षणिक संस्था, वाहतूक, वाहनांची वाढती संख्या तसेच कायदा – सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस आयुक्तालयाची विभागवार पुनर्रचना होणे गरजेचे होते. ही गरज लक्षात घेऊन पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी आणखी १ परिमंडळ व २ अतिरिक्त विभाग वाढवून मिळावा, यासाठी १७ मे २०२३ रोजी शासनास प्रस्ताव पाठविला होता.

आणखी वाचा-पॅरोलवर तुरुंगाबाहेर आला आणि ५० लाखांसाठी पुन्हा तुरुंगात गेला… जाणून घ्या सराईत गुन्हेगारांचा प्रताप

त्यानुसार, राज्याच्या गृह विभागाने ४ सप्टेंबर रोजी पोलीस आयुक्तालयाकरीता आणखी एक परिमंडळ व चार अतिरिक्त विभागांना मान्यता दिली आहे. परिमंडळ उपायुक्त आणि विभागीय सहायक पोलीस आयुक्त यांच्या कायक्षेत्राची पुनर्रचना निश्चित करण्यात आली आहे. नवनिर्मित पोलीस उपायुक्त, परिमंडळ तीनकरिता कार्यालय भोसरी – एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या इमारतीमध्ये कार्यान्वीत करण्यात आले आहे. पोलीस आयुक्तालयात नव्याने हजर झालेले संदीप डोईफोडे यांची परिमंडळ तीनच्या पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वाहतुकीचे व्यवस्थापन व नियोजन याकरिता शिवाजी पवार यांची वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

परिमंडळ कार्यक्षेत्रांची पोलीस ठाणेनिहाय पुनर्रचना

परिमंडळ – एक
सहायक पोलीस आयुक्त (पिंपरी) – पिंपरी, भोसरी
सहायक पोलीस आयुक्त (चिंचवड) – चिंचवड, निगडी, सांगवी
परिमंडळ – दोन
सहायक पोलीस आयुक्त (देहुरोड) – तळेगाव-एमआयडीसी, तळेगाव-दाभाडे, देहुरोड, शिरगाव-परंदवाडी
सहायक पोलीस आयुक्त (वाकड) – रावेत, वाकड, हिंजवडी
परिमंडळ – तीन
सहायक पोलीस आयुक्त (चाकण) – चाकण, म्हाळूंगे-एमआयडीसी, आळंदी
सहायक पोलीस आयुक्त (भोसरी-एमआयडीसी) – दिघी, भोसरी-एमआयडीसी, चिखली

पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

शहरात नव्याने आलेल्या पोलीस निरीक्षकांची देखील पदस्थापना करण्यात आली आहे. यामध्ये अजित लकडे (गुन्हे शाखा), दीपक शिंदे (गुन्हे शाखा), अशोक कदम (चाकण – वरिष्ठ पोलीस निरीक्षक), संतोष कसबे (म्हाळुंगे – गुन्हे), युनूस मुलाणी (चाकण – गुन्हे), शंकर बाबर (वाहतूक शाखा), वैभव शिंगारे (गुन्हे शाखा), मनोज खंडाळे (वाहतूक शाखा), शहाजी पवार (वाहतूक शाखा) यांच्या अंतर्गत बदल्या झाल्या आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Creation of 3rd circle for pimpri chinchwad police commissionerate pune print news ggy 03 mrj
Show comments