पुणे : देशातील आदिवासी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर लगेचच नोकरी मिळण्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) पुढाकार घेतला आहे. आदिवासी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्लेसमेंट पोर्टलची निर्मिती करण्यात आली असून, येत्या महिन्याभरात हे संकेतस्थळ सुरू करण्यात येणार आहे.
एआयसीटीईचे अध्यक्ष डॉ. टी. जी. सीतारामन, उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे यांनी ही माहिती दिली. उच्च शिक्षण संस्थांमध्ये पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना खासगी संस्थांकडून मुलाखती घेऊन नोकरी (प्लेसमेंट) दिली जाते. मात्र शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्याचे प्रमाण नगण्य आहे. या समस्येवर उपाय म्हणून एआयसीटीईने स्वतंत्र संकेतस्थळाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत या संकेतस्थळावर सुमारे अडीच हजार कंपन्यांनी नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांना नोंदणी करण्यासाठी अद्याप संकेतस्थळ खुले करण्यात आलेले नाही. मात्र महिन्याभरात हे संकेतस्थळ सुरू केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना संकेतस्थळामार्फत नोकरी मिळण्यासह मुलाखतीसाठीची तयारी कशी करावी, या बाबतचे मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.
हेही वाचा >>>पुणे: सीबीएसईला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे नियोजन; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली माहिती
या पूर्वी एआयसीटीईने विद्यार्थ्यांना कार्यप्रशिक्षणाच्या (इंटर्नशीप) संधी उपलब्ध होण्यासाठी इंटर्नशीप पोर्टल सुरू केले आहे. या संकेतस्थळाला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. सुमारे अडीच कोटींपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या संकेतस्थळावर नोंदणी केली आहे. तसेच खासगी कंपन्या, सरकारी कंपन्यांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे या कंपन्यांकडून विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. या संकेतस्थळाच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना विद्यावेतन, कामाचा अनुभव मिळत आहे, असे डॉ. सीतारामन यांनी सांगितले.