लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : रावेतमधील क्रिएटिव्ह ॲकॅडमी या निवासी शाळेच्या संचालकाला बलात्काराच्या गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी अटक केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर येत आहे. या संचालकावर आणखी एक गुन्हा दाखल झाला असून, निवासी शाळेची मान्यता नाही, शिक्षण विभागाचे स्वमान्यता प्रमाणपत्र, अग्निशामक विभागाचा परवानाही नसल्याचे समोर आल्याने शाळेच्या चौकशीसाठी चार पर्यवेक्षकांची समिती नेमली आहे.
रावेत येथे क्रिएटिव्ह ॲकॅडमी ही निवासी शाळा आहे. शाळेचा संचालक नौशाद शेख याला विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. तसेच त्याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर महापालिकेच्या शिक्षण विभागाने शाळेत जाऊन पंचनामा केला. शाळेमध्ये निवासी वसतिगृहाची मान्यता नसताना ते बेकायदारीत्या चालविले जात आहे. निवासी शाळेची मान्यता नाही. शिक्षण विभागाकडून दर तीन वर्षांनी नूतनीकरण करून स्वमान्यता प्रमाणपत्र घ्यावे लागते, तेही घेण्यात आले नाही. अग्निशामक विभागाचा ना हरकत दाखला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शाळेची चौकशी करण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाने चौकशी समिती नेमली आहे.
आणखी वाचा-तलाठी भरती परीक्षेतील उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी
शाळेत घडलेल्या प्रकारामुळे विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांना दहावी व बारावीच्या परीक्षेवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. ज्या मुलांना आपल्या पालकांकडे जायचे आहे, त्यांना जाऊ द्यावे. तसेच मुलींची परीक्षा होईपर्यंत त्यांच्या आईंनी वसतिगृहात राहण्याची परवानगी मागितली आहे. त्यांना परवानगी देण्याची सूचना संबंधित शाळेला केली असल्याचे महापालिकेचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी सांगितले.