पिंपरी-चिंचवड महापालिकेत जाण्यास नकार कायम; गावाचे स्वतंत्र अस्तित्व राहावे ही ग्रामस्थांची इच्छा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी पालिकेच्या हद्दीलगतचे आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाला खेटून असणाऱ्या गहुंजे गावचे ‘अर्थकारण’ अलीकडच्या काही वर्षांत विशेषत: आंतरराष्ट्रीय पातळीवरचे क्रिकेट मैदान झाल्यापासून पूर्णपणे बदलून गेले आहे. गहुंजे गावचा नावलौकिक मैदानामुळे बऱ्यापैकी वाढला असून अनेक सुखसुविधा गावात होऊ लागल्या आहेत. गावाचे स्वतंत्र अस्तित्व रहावे, या भावनेतून महापालिकेत जाण्यास गहुंजेकरांचा विरोधच दिसून येतो.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गालगत गहुंजे गाव आहे. एकीकडे मामुर्डी तर दुसरीकडे किवळे गावचा परिसर आहे. मामुर्डी आणि किवळ्याचा यापूर्वीच महापालिकेत समावेश झालेला आहे. जवळपास पाच हजार लोकसंख्या असलेल्या गहुंजे गावात ग्रामपणाच्या विविध छटा ठळकपणे दिसून येतात. अनेक ठिकाणी कच्चे रस्ते आहेत, अपुऱ्या वाटा आहेत. ग्रामपंचायतीचे कार्यालय सुसज्ज आहे. तर, शेजारीच जिल्हा परिषदेच्या शाळेची अवस्था वेगळीच आहे. ग्रामदैवतेच्या मंदिरासमोर दिसणारा सिमेंटचा रस्ता आहे. शेती, बैठी घरे, प्रशस्त बंगले आहेत, तितक्याच आलिशान मोटारी आहेत.

गेल्या काही वर्षांपासून गहुंजेचे अर्थकारण बदललेले आहे. द्रुतगती महामार्गाजवळ असल्याने मुळात गावकऱ्यांच्या जमिनींचा भाव वधारला होता. त्यातच या ठिकाणी स्टेडियम होणार असल्याचे जाहीर झाले, तेव्हापासून जमिनींना सोन्याचा भाव मिळू लागला. इतका, की काही वर्षांपूर्वी २५ लाख रूपये एकरी भाव होता. आता तोच भाव एक कोटीहून अधिक रक्कम इतका झाल्याचे सांगण्यात येते. अनेक दिग्गजांनी, व्यावसायिकांनी या ठिकाणी जमिनी घेतल्या आहेत. लोढा या बांधकाम व्यावसायिकाने १०० एकराहून अधिक जमीन खरेदी केली असून त्यांच्या प्रत्येकी २२ मजली इमारतींची भली मोठी गृहयोजना डोळे दिपवून टाकल्याशिवाय राहत नाही. इतरही गृहयोजनांमुळे गावचे रूपडे बदलून गेले आहे. गावात आता मॉलही होणार आहेत.

भले मोठे क्रिकेटचे मैदान झाले, त्याचे अनेक फायदे गावाला होताना दिसतात. भरीव स्वरूपातील करआकारणी मिळू लागली. मैदानामुळे क्रिकेट सामने असतील, तेव्हा अनेकांना उत्पन्नाचे साधन मिळू लागले. मात्र, सामन्यांच्या दिवशी गावच्या मर्यादाही स्पष्ट होतात. गावात अनेक सुधारणा होऊ लागल्या आहेत. आणखी बऱ्याच सुधारणा अपेक्षित आहेत. गहुंजे गावात शेती हाच प्रमुख व्यवसाय असून नोकरी, दुग्धव्यवसायासह इतर जोडव्यवसायही दिसून येतात. अजूनही शेती करण्याच्या मानसिकतेत काही ग्रामस्थ आहेत. पिंपरी पालिकेत गहुंजे गावचा समावेश होण्याची घोषणा झाली, तेव्हा संमिश्र प्रतिक्रिया उमटली. बाहेरून आलेल्या वर्गाला इतर गोष्टींशी काही घेणं-देणं नाही. पालिकेत जाण्यास त्यांची हरकत नाही. मात्र, गावच्या मूळ रहिवाशांचा महापालिकेत येण्यास तीव्र विरोध आहे. गहुंजे गावच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी यापूर्वीच स्पष्ट विरोध नोंदवला आहे. आजही ती भूमिका गावक ऱ्यांनी कायम ठेवली आहे. महापालिकेत समावेश झाल्यास मोठय़ा प्रमाणात करआकारणी सुरू होईल. आपल्या शेतजमिनींवर आरक्षणे पडतील. बांधकामे बेकायदा ठरवली जातील आणि पाडापाडीची कारवाई होईल, अशा प्रकारची इतर गावांमध्ये असणारी भीती याही ठिकाणी दिसून येते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cricket stadium in pune