पुणे: भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे आतापर्यंत शेतकऱ्यांना मदत केली आहे. मात्र, आता अजिंक्य रहाणे कृषी तंत्रज्ञान नवउद्यमीं(‘स्टार्टअप’ )मध्ये गुंतवणूक करणार आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरतर्फे कृषी तंत्रज्ञान नवउद्यमींसाठी उपक्रमाचे उद्घाटन रहाणे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी रहाणे बोलत होते. एमसीसीआयएचे अध्यक्ष दीपक करंदीकर, महासंचालक प्रशांत गिरबने, क्रीडा पत्रकार विक्रम साठ्ये यांनी रहाणे यांच्याशी संवाद साधला.
मी शेतकरी कुटुबांतला आहे. माझ्या आजीमुळे मला शेतीमध्ये रस निर्माण झाला. पिके, नांगर, मातीशी जोडला गेलो. शक्य तिथे मदत करता येईल ती करण्याचे मार्गदर्शन वडिलांनी केले. २०१४-१५मध्ये श्रीलंकेत असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत कळले. शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याचा विचार होता. त्यानंतर एमसीसीआयएच्या संपर्कात आल्यावर काहीतरी करण्याच्या विचाराला रचनात्मक रूप मिळाले आहे. आपले शेतकरी, कृषी तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारे हे खरे हिरो आहेत. मला गुंतवणुकीतून काहीही अपेक्षा नाही. शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याची भावना आहे. नवउद्यमींची काम करण्याची किती तळमळ आहे, त्याचा किती प्रभाव आहे हे महत्त्वाचे आहे, अशी भावना अजिंक्यने व्यक्त केली.
शेतकरी कधी निवृत्त होत नाही. त्यामुळे माझ्याकडून शेतकऱ्यांसाठी जे करणे शक्य आहे, ते करत राहीन. शेतकऱ्याला कष्ट करावे लागतात. कष्ट करूनही त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो. क्रिकेट आणि शेतीमध्ये एक साम्य आहे. शेतीमध्ये नुकसान झाल्यावर शून्यातून सुरुवात करावी लागते. तसेच क्रिकेटमध्येही अपयशी आल्यावर शून्यापासूनच सुरुवात करावी लागते, असे अजिंक्यने सांगितले.
पुणे महापालिकेत लवकरच २०० पदांची भरती; आयुक्तांची माहिती
अडचणीच्या काळात स्वतःवर आणि प्रत्येक सहकाऱ्यावर विश्वास ठेवावा लागतो. अॅडलेडचा सामना हरल्यावर प्रत्येकावर विश्वास ठेवून कर्णधार म्हणून कामगिरी करून घ्यावी लागली. निकालाचा विचार न करता सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. यश-अपयश म्हणजे प्रसिद्धी, सामनावीर होणे, धावा करणे एवढेच नाही. शतक केले, शून्यावर बाद झालो या पेक्षा मला जे आवडते ते करत राहणे, उणीवा दूर करत राहणे, कौशल्य वाढवत राहणे आवश्यक आहे. आपले अपयश आपण मान्य केले पाहिजे, असे रहाणे यांनी सांगितले. करोना काळात वेगवेगळ्या पातळीवर मदतीचे काम करत होतो. त्यावेळी अजिंक्यने मदतीचा हात दिला होता. एमसीसीआयएतर्फे काही नवउद्यमींची निवड केली जाईल. त्यातून काही नवउद्यमींना अजिंक्यकडून भांडवल उपलब्ध करून दिले जाईल, असे गिरबने यांनी सांगितले.