पुणे : न्यायालायीन कामकाजासाठी वापरण्यात जाणाऱ्या प्रिंटरसाठी दिलेले टोनर बनावट असल्याचे उघडकीस आले आहे. एका नामवंत टोनर निर्मात्या कंपनीच्या नावे न्यायालयीन प्रशासनाला बनावट टोनरची विक्री करण्यात आली. याप्रकरणी न्यायालयीन प्रशासनाला टोनर, तसेच संगणकीय साहित्य विक्री करणाऱ्या व्यावयायिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिवाजीनगर न्यायालयातील कर्मचारी उत्तम थोरात (वय ४६) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, व्यंकटेश्वरा इन्फोटेक मंगलम ब्रेझा या कंपनीच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थोरात शिवाजीनगर जिल्हा न्यायालायात प्रशासकीय कर्मचारी आहेत. शिवाजीनगर न्यायालयातील कामकाजासाठी त्यांनी ३० टोनरची मागणी संबंधित कंपनीकडे पत्राद्वारे केली होती. त्यानंतर संबंधित टोनर न्यायालयातील नाझर कार्यालयात देण्यात आले. संबंधित टोनर एका नामवंत कंपनीचे होते. मात्र, टोनर खराब असल्याचे उघडकीस आल्यानंतर ते परत करण्यात आले.
हेही वाचा >>>पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशांसाठीच्या ‘सीयूईटी’ परीक्षेत काही महत्त्वपूर्ण बदल… आता होणार काय?
त्यानंतर न्यायालयीन प्रशासनाला पुन्हा ३० टोनर देण्यात आले. हे टोनर खराबर असल्याचे उघडकीस आले. थोरात यांनी टोनर निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधला. तेव्हा टोनर बनावट असल्याचे त्यांनी सांगितले. थोरात यांनी न्यायालयीन प्रशासनाला टोनर पुरवठा करणाऱ्या कंपनीविरुद्ध फसवणुकीची तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक संजय पांढरे तपास करत आहेत.