लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात गर्भवतीला पैशांअभावी उपचार नाकारल्याची घटना ताजी असतानाच लवळे येथील एका रुग्णालयातील डॉक्टरने महिलेच्या उपचारासाठी २० हजार रुपये घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रुग्णालयातील डॉक्टरविरोधात बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ४ ते ९ एप्रिल दरम्यान घडली.
याप्रकरणी दिलीप लकाप्पा शिवशरण (वय ३८, रा. उत्तमनगर, पुणे) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवशरण यांच्या चुलतीला पित्ताशयाचा त्रास होत होता. त्यामुळे तिला उपचारासाठी लवळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे रुग्णालय धर्मादाय आहे. तेथील एका डॉक्टरने रुग्णाच्या नातेवाइकांना ‘तुमच्या रुग्णाची परिस्थिती खूप नाजूक आहे. त्यांच्यावर तत्काळ उपचार करावे लागतील. नाहीतर रुग्ण दगावू शकतो. रुग्णाला वाचवायचे असेल, तर मला शस्त्रक्रियेसाठी पैसे द्यावे लागतील. पैसे दिले तरच उपचार करीन अन्यथा नाही, अशी भीती दाखवून डॉक्टरने २० हजार रुपये रोख घेऊन फसवणूक केली. फौजदार फड तपास करीत आहेत.