पुणे : दोन गटांतील वादातून लष्कर पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्या प्रकरणी पुणे कटक मंडळातील भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक विवेक यादव यांच्यासह आठ ते दहा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी लष्कर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक विवेक यादव (वय ४०, रा. वानवडी), त्यांचा भाऊ संतोष यादव (वय २५, रा. लुल्लानगर), सागर वैऱ्या (वय २०), पंकज जगताप (वय ३५, रा. कुंभारबावडी, लष्कर), सुशील यादव (वय ३५), शिवाजी उर्फ छत्या यांच्यासह आठ ते दहा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अमित नारायण मोरे (वय २८, रा. लष्कर) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना शुक्रवारी (१४ एप्रिल) रात्री साडेअकराच्या सुमारास लष्कर भागात घडली.
हेही वाचा >>> पुणे : अत्याचाराची तक्रार मागे घेण्यासाठी आई आणि मुलीला जीवे मारण्याची धमकी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने लष्कर भागातून मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीत अमित मोरे सहभागी झाले होते. मिरवणूक बाटा चौकात आली होती. त्या वेळी मोरे यांच्या ओळखीतील संतोष यादव, सागर वैऱ्या आणि साथीदारांनी त्यांना धक्का दिला. मोरे यांच्याबरोबर असलेल्या एका मित्राला मारहाण केली.
हेही वाचा >>> वेताळ टेकडी वाचवण्यासाठी पुण्यात भर पावसात लाँग मार्च
त्यानंतर मोरे आणि मित्र लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते. त्या वेळी माजी नगरसेवक विवेक यादव साथीदारांसह तेथे आले. यादव यांनी त्यांच्या कंबलेला लावलेले पिस्तूल रोखले आणि तक्रार मागे न घेतल्यास जीवे मारु, अशी धमकी दिली, असे मोरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची माहिती मिळताच मिरवणूक बंदोबस्तात असलेल्या परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश तटकरे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. सहायक पोलीस निरीक्षक शीतल जाधव तपास करत आहेत.
माजी नगरसेवकांविरुद्ध आणखी एक गुन्हा
भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक विवेक यादव यांच्या विरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहे. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) यादव यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली होती. मोक्का कारवाईत यादव यांनी न्यायालयाकडून जामीन मिळवला आहे. शुक्रवारी रात्री यादव यांनी लष्कर पोलीस ठाण्याच्या आवारात एकाला मारहाण केली. पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना समजावून सांगितले. मात्र, पोलिसांना न जुमानता अरेरावी केल्याने सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी यादव यांच्या विरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला.