बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढविल्याप्रकरणी पिंपरी- चिंचवड पालिकेतील नगरसेवकपद रद्द करण्यात आलेल्या सीमा फुगे (रेणुसे) व अनिता ढगे (लांडे) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विभागीय जात प्रमाणपत्र समितीच्या दक्षता पथकाच्या तक्रारीवरून येरवडा पोलिसांकडे हे गुन्हे दाखल झाले आहेत.
रेणुसे व लांडे यांनी विभागीय जात प्रमाणपत्र समिती क्रमांक तीनच्या कार्यालयाची खोटी कागदपत्रे तयार केली. त्यावर खोटय़ा सह्य़ा व शिक्के मारले. जातीची ही प्रमाणपत्रे पिंपरी पालिका निवडणुकीसाठी वापरून जात प्रमाणपत्र समिती, पिंपरी- चिंचवड पालिका, आयुक्त व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची फसवणूक केली आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.
सीमा फुगे व अनिता ढगे यांनी भोसरी गावठाणमधून निवडणूक लढविली होती. हा वॉर्ड ओबीसींसाठी राखीव होता. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांनी कुणबी असल्याचे जात प्रमाणपत्र सादर केले होते. निवडणुकीमध्ये फुगे या विजयी झाल्या. मात्र, प्रतिस्पर्धी उमेदवार सारिका कोतवाल यांनी त्यांचे प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप करून आक्षेपही घेतला. माहिती अधिकारात फुगेंच्या माहेरकडील रेणुसे या नावाने प्रमाणपत्र काढल्याचे व त्याचा क्रमांक दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर असल्याचे उघड झाले. जातपडताळणी समितीनेच ही माहिती पालिकेला कळवली.
जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या माध्यमातून फुगे यांची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर पालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी फुगेंचे नगरसेवकपद रद्द करण्याची शिफारस निवडणूक आयोगाकडे केली. त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर १० मार्चला त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची कारवाई आयुक्तांनी केली. त्यानंतर आता फसवणुकीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime against fuge and dhage for submitting fake cast certificate
Show comments