‘परांजपे स्किम्स’ यांच्या पाषाण रस्त्यावरील अथश्री प्रकल्पामध्ये सदनिका विकत घेताना फसवणूक झाल्याची तक्रार तेथील रहिवासी निवृत्त कॅप्टन मनोहर बोडस यांनी केली आहे. सदनिका विकताना केलेल्या करारात नमूद केलेल्या सुविधा बांधकाम व्यावसायिक शशांक परांजपे व श्रीकांत परांजपे यांनी पुरवल्या नसल्याचे बोडस यांनी म्हटले असून, याबाबत त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रारही दिली आहे.
अथश्री हा पाषाण रस्त्यावर ज्येष्ठ नागरिकांसाठी उभारण्यात आलेला गृहप्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये सध्या ३२५ ज्येष्ठ नागरिक राहतात. बोडस यांनी २००६ मध्ये या प्रकल्पामध्ये ५ लाख ४० हजार रुपयांना सदनिका खरेदी केली. त्या वेळी करारात विविध सुविधांचा उल्लेख होता. त्यात पाहुण्यांसाठी खोल्या, दोन भोजनगृह, स्वयंपाक घर, अॅम्फी थिएटर, उद्यान, व्यायामशाळा, ग्रंथालय अशा विविध सुविधा पुरवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात या सुविधा पुरवण्यात आलेल्या नाहीत, असा आरोप बोडस यांनी केला आहे. त्याला आधार म्हणून बोडस यांनी माहितीच्या अधिकारात महापालिकेतून कागदपत्रे मिळवली आहेत. या स्किमचा म्हणून सादर केलेला आराखडा त्यांनी मिळवला. त्यात अनेक धक्कादायक गोष्टी उघडकीस आल्या आहेत.
परांजपे यांनी अथश्रीचा म्हणून महापालिकेला सादर केलेला नकाशा आणि करारात ग्राहकांना सादर केलेला नकाशा यात अनेक तफावती आहेत. ग्राहकांना प्रत्येक मजल्यावर गेस्ट रूम म्हणून साधारणत: १५० फुटांच्या दोन रूम्स दाखवण्यात आल्या होत्या. मात्र, पालिकेला सादर केलेल्या आराखडय़ात त्या स्टोअर रूम व स्टडी रून म्हणून दाखविण्यात आल्या आहेत. यापैकी काही रूम्स विकल्या असल्याचा व काही भाडय़ाने दिल्याचा आरोपही बोडस यांनी केला आहे. याशिवाय ग्राहकांशी केलेल्या करारात दोन डायनिंग हॉल, अॅम्फी थिएटर, सामाईक किचन, वाचनालय या सुविधांचा उल्लेख आहे. मात्र, पालिकेला सादर केलेल्या आराखडय़ात त्यांचा समावेश नाही. याचा अर्थ या सुविधा ग्राहकांच्या सामाईक जागेवरच उभारण्यात आल्या आहेत. इतकेच नाही तर परवानगी नसताना दोन वाचनालये इमारतींच्या टेरेसवर उभारण्यात आली आहेत, असा आरोपही बोडस यांनी केला आहे.
त्याचप्रमाणे अपार्टमेंटच्या मेंटेनन्ससाठी परांजपे यांनी प्रत्येक सदस्याकडून १ लाख रुपये अनामत घेतली आहे. या रकमेच्या व्याजातून या प्रकल्पाचा मेंटेनन्स करण्यात येणार असल्याचे खरेदीपत्रामध्येही म्हटले आहे. मात्र, प्रत्यक्षात या रकमेचे बँक अकाऊंट उघडण्यात आलेले नाही, अशी माहिती बोडस यांनी दिली. याबाबत त्यांनी परांजपे यांच्याविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी ‘महाराष्ट्र ओनरशीप फ्लॅट अॅक्ट’ या काद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ‘‘सदनिका खरेदी करताना परांजपे यांनी आम्हाला बनावट नकाशा दाखवला. सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले, त्यातील कोणत्याही सुविधा प्रत्यक्षात दिल्या नाहीत. त्याचप्रमाणे मेंटेनन्ससाठी घेतलेली अनामत रक्कमही स्वत:साठी वापरली,’’ असे बोडस यांनी सांगितले.
 दरम्यान, शशांक परांजपे यांच्यांशी संपर्क साधला असता त्यांनी, या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे सांगितले. ‘‘बोडस यांचे आरोप धादांत खोटे आहेत. बोडस यांच्याव्यतिरिक्त त्या प्रकल्पामध्ये राहणाऱ्या इतर कोणत्याही सदस्यांची अशी तक्रार नाही. सदस्यांना कबूल केलेल्या सर्व सुविधा आम्ही पुरवल्या आहेत. संस्थेचे सर्व हिशोब वेळेवर पूर्ण केले आहेत. आजपर्यंत या हिशोबाबाबत चार्टर्ड अकाऊंटंटने आक्षेप घेतलेला नाही. या प्रकल्पामध्ये मिळालेल्या चांगल्या सुविधांबद्दल आम्हाला मानपत्रही मिळालेले आहे,’’ असे परांजपे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा