पुणे : वन्यप्राणी नाेंदीत हेतुपुरस्सर तफावत आणि अनियमितता केल्याप्रकरणी कात्रज येथील पुणे महापालिकेचे राजीव गांधी प्राणिसंग्रहालय आणि वन्यप्राणी संशोधन केंद्राचे संचालक डाॅ. राजकुमार जाधव यांच्याविरुद्ध वन विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला. कात्रज येथे पुणे महापालिकेचे राजीव गांधी प्राणिसंग्रहालय, वन्यप्राणी संशोधन केंद्र, वन्यप्राणी अनाथालय केंद्र आहे. वनविभाग, तसेच स्वयंसेवकांकडून आजीवन देखभालीसाठी तेथे प्राणी पाठविले जातात. दोन चौसिंगा, दोन तरस वन विभागाने वन्यप्राणी अनाथालयात दाखल केले होते.
वन्यप्राणी आदान-प्रदान करण्यासाठी वन विभागाच्या परवानगीची आवश्यकता असते. डाॅ. जाधव यांनी वन विभागाची परवानगी न घेता दोन चौसिंगा आणि दोन तरस अशा प्राण्यांना अनाथालयातून राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात हलवले. त्यांचे बेकायदा प्रजनन केले, तसेच वन्यप्राण्यांची मार्गदर्शक सूचनेनुसार जोपासना केली नाही. वन्यप्राणी नोंदीत हेतुपुरस्सर तफावत आणि अनियमितता केली. त्यामुळे डाॅ. जाधव यांच्याविरुद्ध वन विभागाने वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलमान्वये गु्न्हा दाखल केला असल्याचे पुणे वन विभागाचे सहायक वन संरक्षक आशुतोष शेंडगे यांनी सांगितले.