लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तत्कालीन लेखाअधिकारी किशोर शिंगे यांच्यासह पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी शिंगे यांची एसीबीकडून चौकशी करण्यात आली होती. चौकशीत ज्ञात उत्पन्नापेक्षा ५६ लाख ४० हजार २६४ रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचे उघडकीस आले आहे.
याप्रकरणी किशोर बाबुराव शिंगे, त्यांची पत्नी भाग्यश्री किशोर शिंगे यांच्याविरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक माधुरी भोसले यांनी फिर्याद दिली आहे.
आणखी वाचा- नियम डावलून ‘एमपीएससी’मध्ये प्रतिनियुक्ती? माहिती अधिकार अर्जाला काय दिले उत्तर?
शिंगे हे पिंपरी चिंचवड महापालिकेत लेखाधिकारी म्हणून नियुक्तीस होते. शिंगे सेवानिवृत्त झाले आहेत. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी त्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू होती. त्यांनी सेवा कालावधीत मिळवलेल्या उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न मिळविले होते. उत्पन्नाबाबत शिंगे दाम्पत्य समाधानकारक खुलासा करुन शकले नाही. ज्ञात उत्पन्नपेक्षा शिंगे यांनी ५६ लाख ४० लाख २६४ रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमाविल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे तपास करत आहेत.
आणखी वाचा-‘नाण्यां’साठी विद्यापीठाकडून लाखोंची ‘चांदी’
दरम्यान, बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी झोपडपट्टी पुनर्वसन कार्यालयातील तत्कालिन उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष यादव यांच्यासह पत्नीविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला. यादव यांची एसीबीकडून चौकशी करण्यात आली. यादव यांनी ज्ञात उत्पन्नापेक्षा एक कोटी ३८ लाख ७४ हजार रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. याप्रकरणी शिरीष रामचंद्र यादव, त्यांची पत्नी प्रतिक्षा शिरीष यादव यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलमांन्वये नुकताच बंडगार्डन पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला.