लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : बेहिशेबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी पुण्यातील तत्कालीन शिक्षण उपसंचालक आणि सध्या नंदूरबार येथे माध्यमिक शिक्षण अधिकारी म्हणून कर्तव्य बजाविणाऱ्या अधिकाऱ्यासह त्याच्या पत्नीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आजवरच्या कार्यकाळात कायदेशीर उत्पन्नापेक्षा स्वत:च्या आणि पत्नीच्या नावे ३१ लाख ७८ हजार २०० (ज्ञात उत्पन्नापेक्षा २५.२६ टक्के) किमतीची अपसंपदा भ्रष्ट मार्गाने जमवल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.

प्रवीण वसंत अहिरे (वय ४६) आणि स्मिता प्रवीण अहिरे (वय.४१, रा.आनंदनगर, पाथर्डी फाटा, नाशिक) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक रुपेश जाधव यांनी फिर्याद दिली आहे.

आणखी वाचा-आळंदी: महाविकास आघाडीच इंद्रायणी बचाव एल्गार; दिला ‘भाजप हटाव, इंद्रायणी बचाव’ चा नारा..

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण अहिरे हे पुण्यात शिक्षण उपसंचालक म्हणून नोकरीस होते. सध्या ते नंदूरबार येथे माध्यमिक शिक्षण अधिकारी म्हणून कर्तव्यावर आहेत. त्यांनी संपादित केलेल्या मालमत्तेबाबत पुणे एसीबी कार्यालयाकडून उघड चौकशी करण्यात आली होती. अहिरे यांनी मालमत्ता कायदेशीर पद्धतीने संपादित केल्या आहेत की नाही? याबाबत त्यांना वेळोवेळी संधी देऊन माहिती घेण्यात आली. मार्च २००२ ते फेब्रुवारी २०२० दरम्यानच्या कार्यकाळातील परीक्षण करण्यात आले. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या या कार्यकाळात कायदेशीर उत्पन्नापेक्षा स्वत:च्या आणि पत्नीच्या नावे ३१ लाख ७८ हजार किमतीची अपसंपदा भ्रष्ट मार्गाने जमवल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.

बेहिशेबी मालमत्ता संपादित करण्यासाठी प्रवीण अहिरे यांना त्यांची पत्नी स्मिता यांनी गुन्हा करण्यास प्रोत्साहित केले. त्यामुळे पुणे एसीबीने दोघांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे.