विमानतिकिटासाठी पैसे आकारुन तिकिट न देता फसवणूक करणाऱ्या एका ट्रॅव्हल्स कंपनीच्या संचालकाविरुद्ध सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी मोहन विष्णू मेढेकर, केदार मोहन मेढेकर यांच्यासह एका महिलेविरुद्ध (तिघे रा. वैजनाथ कॉम्प्लेक्स, मानाजीनगर, नऱ्हे) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. अजित हिंगे (वय ४२, रा. नऱ्हे) यांनी यासंदर्भात सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
स्वागत हॉलिडेमार्फत हिंगे पंधरवडय़ापूर्वी बंगळुरु, उटी आणि म्हैसूर येथे जाणार होते. त्यांनी रेल्वेने प्रवास करण्यासाठी वातानुकूलित सुविधेची मागणी केली होती. परंतु त्यांना वातानुकूलित शयनयानचे तिकिट न मिळाल्याने विमानतिकिटाची मागणी केली होती.
विमानतिकिटासाठी मेढेकर यांनी जादा पैशांची मागणी केली. त्यानुसार हिंगे यांनी पैसे दिले. विमानतिकिट न दिल्याने त्यांनी मेढेकर यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा त्यांना मारण्याची धमकी दिली. मेढेकर यांनी माझी ७१ हजार ६०० रुपयांची फसवणूक के ल्याचे हिंगे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक बनसोडे तपास करत आहेत.