पुणे : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरल्याने एका तरुणावर बिबवेवाडी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दीपक काेंढरे (रा. अंधेरी, मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या आराेपीचे नाव आहे. याप्रकरणी संजय हरिदास वाघमारे (वय ३७, रा. बिबवेवाडी, पुणे) यांनी पाेलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. हा प्रकार १४ जून रोजी बिबवेवाडी येथे घडला.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दीपक काेंढरे याने मागील भांडणाच्या कुरापती काढून तक्रारदार वाघमारे यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. ‘आंबेडकर यांना घेवून पाेलीस ठाण्यात जाऊन माझ्याविरुद्ध काही तक्रार केली का’ असे असे विचारत आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरुन कोंढरे याने वाघमारे यांना शिवीगाळ केली. तसेच वाघमारे यांचा मोबाइल स्पिकरवर असल्याने त्यांच्यासाेबत असलेल्या कार्यकर्त्यांना देखील कोंढरे याने केलेली शिवीगाळ आणि धमकीवजा संभाषण ऐकू गेले. सार्वजनिक ठिकाणी पाणउतारा करून अपमान केल्यामुळे वाघमारे यांनी पोलिसांमध्ये फिर्याद दाखल केली. सहाय्यक पाेलीस आयुक्त एस. साळवे पुढील तपास करत आहेत.