गुंड गजा मारणे याच्या नावाने भंगार व्यावसायिकाकडे खंडणी मागून गोळ्या घालण्याची धमकी देणाऱ्या तिघांना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
खंडू सतीश लोंढे (वय ३२, रा. वैदुवाडी, हडपसर), सोमनाथ ऊर्फ सोमा शिवाजी शिंदे (वय २३, रा. रामटेकडी, हडपसर) व संजय मारुती डिखळे (वय ४९, रा. वानवडी) अशी पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपी खंडू लोंढे हा काँग्रेसचे नगरसेवक सतीश लोंढे यांचा मुलगा आहे. सोमा शिंदे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर वानवडी पोलीस ठाण्यामध्ये खुनासह इतर गुन्हे दाखल आहेत.
फुलचंद तेजमल ओसवाल (वय ५२, रा. फुलवाला चौक, रविवार पेठ) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. ओसवाल व खंडू लोंढे यांचा भंगार मालाचा खरेदी व विक्रीचा व्यवसाय आहे. ते एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत. आरोपींनी ओसवाल यांना गुरुवारी मोबाईलवर संपर्क साधला व पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. खंडणी न दिल्यास गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली.
आरोपींनी हा गुन्हा नेमक्या कोणत्या कारणांसाठी केला व त्यात त्यांचे आणखी साथीदार कोण आहेत. त्याचप्रमाणे गुंड गजा मारणे याचे नाव घेऊन त्यांनी खंडणी मागीतली असल्याने आरोपींचा त्याच्याशी काही संबंध आहे का, हे तपासण्यासाठी सरकारी वकिलांनी आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली. ही मागणी न्यायालयाने मान्य केली.

Story img Loader