पुणे : घरफोडी केल्यानंतर दागिने विक्रीसाठी आलेल्या नेपाळमधील चोरट्याला गुन्हे शाखेने अटक केली. नेपाळी चोरट्याकडून ११ लाख ५९ रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले. चोरट्याने शहरातील उच्चभ्रु सोसायटीत घरफोडीचे गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनिल मीनसिंग खडका (वय २५, सध्या रा. वारजे मा‌ळवाडी, मूळ रा. नेपाळ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. खडकाने २२ नोव्हेंबर रोजी हडपसर भागातील एका उच्चभ्रु सोसायटीत घरफोडी केली होती. तो ज्येष्ठ नागरिकांची शुश्रुषा करायचा. उच्चभ्रु सोसायटीतील बंद सदनिकांची पाहणी तो करायचा. हडपसर भागातील एका सदनिकेत तो गॅलरीतून शिरला. त्यानंतर त्याने शयनगृहातील कपाट उचकटून दागिने, रोकड चोरी केली होती. ऐवज चोरून तो पसार झाला होता. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा >>> पिंपरी-चिंचवडमध्ये दर वर्षी तीन हजार झाडांवर कुऱ्हाड?

गुन्हे शाखेच्या युनिट पाचकडून समांतर तपास करण्यात येत होता. पसार झालेला खडका वारजे माळवाडी भागात दागिने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी अमित कांबळे आणि तानाजी देशमुख यांना मिळाली. त्यानंतर सापळा लावून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने घरफोडीची कबुली दिली. त्याच्याकडून ११ लाख ५९ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युवराज हांडे, सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, प्रताप गायकवाड, प्रमोद टिळेकर, विनोद निंभोरे, विनोद शिवले, अकबर शेख यांनी ही कामगिरी केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime branch arrested thief from nepal who came to sell jewellery after burglary house pune print news rbk 25 zws