पिंपरी : पोलीस असल्याची बतावणी करीत दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी दोन विद्यार्थ्यांचे अपहरण करणार्‍या टोळीतील दोघा आरोपींना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. योगेश विश्वास सावंत (वय ३४, रा. राऊतनगर, अकलूज, जि. सोलापूर) आणि ज्ञानेश्वर विलास घाडगे (वय २६, रा. मगरवस्ती खंडाळी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी २१ वर्षीय विद्यार्थ्याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> उलटी केल्याने प्रेयसीच्या चार वर्षांच्या मुलाचा खून,नाशिकमधील आरोपी अटकेत; बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी

फिर्यादी व त्यांचा मित्र हे दोघेजण दुचाकीवरून चालले होते. यावेळी दोन कारमधून आलेल्या आरोपींनी दोघांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून अपहरण केले. तसेच, आरोपींनी पोलीस असल्याचे ओळखपत्र दाखवत दोन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. मात्र, पैसे न मिळाल्याने आरोपींनी ५० हजार रुपये किंमतीच्या पाच ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या, १ लाख २५ हजार रुपये किंमतीची २५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, १५ हजारांचे घड्याळ असा ऐवज मारहाण करून काढून घेतला. त्यांना मारहाण करून फलटण येथे रात्रभर डांबून ठेवले. त्यानंतर ३० ऑगस्ट रोजी पंढरपूर महामार्गावर सोडून दिले.

हेही वाचा >>> लोहमार्ग पोलीस मुख्यालयासमोर दुचाकीस्वार रुणाची लूट, संगम पूल परिसरातील घटना

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाला समांतर तपासाचे आदेश दिले. पथकाने घटनास्थळाजवळील तसेच टोलनाक्यावरील ७०-८० सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. आरोपी माळशिरस येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, एक टीम माळशिरस येथे रवाना करण्यात आली. फौजदार  सुनिल भदाणे व टीमने स्थानिक पोलीसांच्या मदतीने सावंत, घाडगे यांना अकलूज येथून ताब्यात घेतले. त्यांनी इतर साथीदारांच्या मदतीने गुन्हा केला असल्याची कबुली दिली. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली स्वीफ्ट कार व दोन मोबाईल असा ८ लाख ४० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी घाडगे पोलीस रेकॉर्डवरील असून, त्याच्यावर वेळापूर पोलीस स्टेशन, सोलापूर येथे गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल आहे. तसेच, इतर आरोपींवरही खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, अ‍ॅट्रॉसिटी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime branch arrested two member of gang who kidnapped two students for ransom pune print news ggy 03 zws