पुणे : बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या गुंडाला गुन्हे शाखेने अटक केली. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील दरी पूल परिसरात ही कारवाई करण्यात आली. सराइताकडून दोन पिस्तुले, तसेच सहा काडतुसे जप्त करण्यात आली. निलेश ज्ञानेश्वर भरम (वय ३५, रा. वैष्णवी प्रेस्टीज, साईसिद्धी चौक, आंबेगाव बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव अहो.

हेही वाचा >>> शहरात चार घरफोड्या; दहा लाखांचा ऐवज चोरीला; बंद सदनिका चोरट्यांचे ‘लक्ष्य’

भरम याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ, सहकारनगर, स्वारगेट, कोंढवा,खडक, बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. पनवेलमध्ये भरमविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. खूनाचा प्रयत्न, गोळीबार, दरोडा, खंडणी असे १६ गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, संजय जाधव बाह्यवळण मार्गावरील दरी पूल परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी भरम दरी पूल परिसरात येणार असून, त्याच्यााकडे पिस्तूल असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. त्याच्याकडून दोन पिस्तुले, सहा काडतुसे जप्त करण्यात आली. पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक निरीक्षक आशिष कवठेकर, उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, संजय जाधव, शंकर नेवसे, अमोल सरडे यांनी ही कारवाई केली.

Story img Loader