पुणे: पुण्यासह नगर, सोलापूर जिल्ह्यात घरफोडी, तसेच दरोडा घालण्याचे गुन्हे करणारा दरोडेखोराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. पोलिसांच्या पथकावर गोळीबार करुन पसार झालेल्या दरोडेखाेराला पकडण्यासाठी सोलापूर आणि नगर पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत होते. हडपसर भागात गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला सापळा लावून पकडले. त्याच्याकडून सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
हंसराज रणजीतसिंग टाक (वय १८, रा. हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या दरोडेखोराचे नाव आहे. गुन्हे शाखेतील युनिट सहाचे पथक हडपसर भागात गस्त घालत होते. त्यावेळी टाक हा कॅनोल रस्ता परिसरात थांबल्याची माहिती पोलीस कर्मचारी नितीन मुंढे यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून टाक याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने पुणे शहरातील हडपसर, लोणी काळभोर, लोणीकंद परिसरात घरफोडीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले. चौकशीत त्याने नऊ गुन्हे केल्याचे उघडकीस आले असून, सहा लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हेही वाचा… पुणे विमानतळाचे उड्डाण रखडले! नवीन टर्मिनलचे उद्घाटन होईना अन् जुने नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत
गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट सहाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल, उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, सुरेश जायभाय, विठ्ठल खेडकर, नितीन मुंढे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, प्रतीक लाहीगुडे, कानिफनाथ कारखेले यांनी ही कारवाई केली.