पुणे : शहरातील गुंडांची झाडाझडती घेण्यासाठी मध्यरात्री गुन्हे शाखा तसेच पोलीस ठाण्यांमधील पथकांनी विशेष मोहीम राबविली. या कारवाईत पोलिसांनी शहरातील साडेतीन हजार सराईत गुंडाची झाडाझडती घेतली. त्यापैकी ६८५ गुन्हेगार मूळ पत्त्यावर राहत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी दोन पिस्तुलांसह, काडतुसे, तलवारी, कोयते जप्त केले. चंदननगर भागातील एका हुक्का पार्लरवरही कारवाई करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहरातील वाढती गुन्हेगारी तसेच गुन्हेगारांना जरब बसविण्यासाठी पोलिसांकडून अचानक विशेष मोहीम (ऑल आऊट आणि कोबिंग ऑपरेशन) राबविण्यात येते. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त नामदेव चव्हाण, राजेंद्र डहाळे, उपायुक्त भाग्यश्री नवटके, प्रियंका नारनवरे, सागर पाटील, पौर्णिमा गायकवाड, रोहीदास पवार, वाहतूक शाखेचे उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा तसेच स्थानिक पोलीस ठाण्याची पथके या मोहिमेत सहभागी झाली होती.

दोन पिस्तुल, चार काडतुसे, ७९ खराब काडतुसे, दोन तलवारी, २१ कोयते जप्त

बेकायदा पिस्तुल बाळगल्या प्रकरणी पोलिसांच्या गुन्हे शाखेने तीन ठिकाणी कारवाई केली. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींकडून दोन पिस्तुलांसह चार काडतुसे, ७९ खराब काडतुसे असा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा तलवार, कोयते बाळगल्या प्रकरणी २९ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन तलवारी, २१ कोयते जप्त करण्यात आली.

भारती विद्यापीठ परिसरातील फरार गुन्हेगार प्रथमेश चंद्रकांत कांबळे (वय १८, रा. कात्रज) याला पकडण्यात आले तसेच जय विटकर, अनिल विटकर (रा. लाल चाळ, गोखलेनगर) यांना मारहाण प्रकरणातील गुन्ह्यात अटक करण्यात आली. वडकी गावातील शेखर अनिल मोडक (वय २७), पंकज अभिमन्यू रणवरे (वय ३५, रा. रामकृष्ण अपार्टमेंट, बाणेर रस्ता) यांना अटक करण्यात आली. दोघांकडून दोन पिस्तुल, चार काडतुसे जप्त करण्यात आली.

कारवाईत हुक्कापात्र, तंबाखूजन्य पदार्थ जप्त

अमली पदार्थ विरोधी पथकाने चंदननगर भागातील बेकायदा हुक्का पार्लरवर कारवाई केली. या कारवाईत हुक्कापात्र, तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. या प्रकरणी हुक्का पार्लरचा मालक सिद्धार्थ राजेश अष्टेकर (वय २५, रा. चंदननगर) याला अटक करण्यात आली.

हेही वाचा : पुणे : विश्रांतवाडीतील खाणीत सापडले दोन बेपत्ता तरुणांचे मृतदेह

पर्वती पायथा परिसरातून ५६ काडतुसे जप्त

पर्वती पायथा परिसरातील जनता वसाहतीत गुन्हे शाखेच्या युनिट एकने कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी ५६ जिवंत काडतुसे, ७९ खराब काडतुसे तसेच ९७० बुलेट लिड जप्त केले. या प्रकरणी दिनेशकुमार कल्लूसिंग सरोज (वय ३४, रा. जनता वसाहत, पर्वती पायथा) याला अटक करण्यात आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime branch police raid on 3500 criminals weapons seized in pune print news pbs