लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : गणेशोत्सवात चोरीच्या घटना रोखण्यासाठी गुन्हे शाखेची पथके तैनात करण्यात आली आहेत. महिला सुरक्षेसाठी दामिनी पथक देखील सज्ज आहे. शहरातील पोलीस चौक्या बंद झालेल्या नाहीत. नागरिक आपल्या तक्रारी घेऊन चौक्यांमध्ये जाऊ शकतात. तेथून नागरिकांना पोलीस मदत मिळेल, अशी ग्वाही पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिली.
गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी, शांतता कमिटी, पोलिसांची बैठक पार पडली. खासदार श्रीरंग बारणे, आमदार दिलीप मोहिते, उमा खापरे, सहपोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यावेळी उपस्थित होते.
ग्रामरक्षक, दक्षता कमिटी, शांतता कमिटी यांच्या मदतीने गणेशोत्सवात निगराणी ठेवली जाणार आहे. प्रत्येक मंडळाचे पाच कार्यकर्ते देखील पोलिसांच्या मदतीला असणार आहेत. विसर्जन मिरवणुकांमध्ये काही मंडळे एकाच ठिकाणी जास्त वेळ थांबतात. यामुळे वाद निर्माण होतात. त्याबाबत मंडळांना सूचना देण्यात आल्या आहेत. ध्वनिक्षेपकाच्या वापरासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या नियमाप्रमाणे राज्य शासन आणि जिल्हाधिकारी परवानगी देतात. त्याचे सर्वांनी पालन करावे. महापालिकेसोबत मिळून रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याबाबत एक मोहीम राबविली जाईल. गणेशोत्सव मंडळांच्या परवानगीसाठी ऑनलाइन सुविधा करण्यात आल्याचे पोलीस आयुक्त चौबे यांनी सांगितले.
सर्वोत्तम गणेशोत्सव मंडळांचा सत्कार
पुणे शहरातील विघ्नहर्ता न्यासच्या धर्तीवर मोरया न्यासच्या माध्यमातून शहरातील सर्वोत्तम गणेशोत्सव मंडळांचा पोलिसांच्या वतीने सत्कार केला जाणार आहे. त्यासाठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणपती मंडळ, सुरक्षा कमिटी सदस्यांची एक समिती नेमली जाणार आहे. त्या माध्यमातून उत्कृष्ट मंडळांना पुरस्कार दिला जाणार असल्याची घोषणा पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केली.
विसर्जन घाटांवरील सुरक्षा, गणेशोत्सव काळात वाहतूक विस्कळीत होणार नाही, याची पोलिसांनी काळजी घ्यावी. गणेशोत्सवात गर्दी होत असल्याने चोऱयांचे प्रमाण वाढते. त्याबाबत काळजी घ्यावी. -श्रीरंग बारणे, खासदार, मावळ