पुणे : स्वारगेट एसटी आगारातील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेची गुन्हे शाखेने लष्कर पोलीस ठाण्यात तब्बल तीन तास कसून चौकशी केली. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांनी चौकशी केली. मात्र, गाडे पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत असल्याची माहिती आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गाडेचा मुक्कम सध्या लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीमध्ये आहे. या गुन्ह्याचा तपास स्वारगेट पोलिसांकडून नुकताच गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. हा तपास खंडणी विरोधी पथक एककडे सोपविण्यात आला आहे. स्वारगेट एसटी आगाराच्या आवारात २५ फेब्रुवारी रोजी सकाळी सहाच्या सुमारास परगावी निघालेल्या एका प्रवासी तरुणीकडे आरोपी गाडेने वाहक असल्याची बतावणी करून तिला एका शिवशाही बसमध्ये नेले. दरवाजा लावून घेत त्याने तरुणीला जिवे मारण्याची धमकी देऊन दोनदा बलात्कार केल्यानंतर गाडे गुनाट (ता. शिरूर) गावी फरार झाला होता. पोलिसांनी त्याला २८ फेब्रुवारी रोजी पहाटे ऊसाच्या शेतातून ताब्यात घेतले.

लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीतून गाडे याला गुरुवारी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तीन तास कसून चौकशी करण्यात आली. परंतु, चौकशीत गाडेने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याची माहिती आहे. गुन्हे शाखेकडे गुन्हा वर्ग करण्यात आल्यानंतर गुरूवारपासून प्रत्यक्ष कामकाला सुरुवात झाली. अद्याप पोलिसांना गाडेच्या मोबाईलचा शोध घ्यावा लागणार आहे. मोबाईलचे विश्लेषण केल्यानंतर ठोस माहिती हाती लागण्याची शक्यता आहे. आरोपीने यापूर्वीही मोबाईलमध्ये महिलांचे व्हिडिओ चित्रीकरण करून त्यांना ब्लॅकमेल केल्याची चर्चा आहे. त्यामुळे आरोपीचा मोबाईल जप्त करून त्याची तपासणी करणे आवश्यक आहे.