दिवसा उच्चभ्रू सोसायटय़ांमध्ये प्रवेश करून तेथील बंद असलेल्या सदनिका फोडून दागिने चोरणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींनी पंचवीस गुन्ह्य़ांची कबुली दिली असून, त्यांच्याकडून २५ लाख ३६ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
नीलेश अंकुश काळे (वय ३६, रा. गांधीनगर झोपडपट्टी, देहू रोड), अमीर अन्तून शिंदे (वय २५, रा. आंबेडकर झोपडपट्टी, पिंपरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. शहरामध्ये अलीकडच्या काळामध्ये दिवसा घरफोडी करण्याचे प्रमाण वाढल्याने याबाबत गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या वतीने तपास करण्यात येत असताना पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना या दोघांविषयी माहिती मिळाली. दोघेही आरोपी सातत्याने त्यांचे राहण्याचे ठिकाण बदलत होते. त्यांच्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार त्यांना सांगवी भागात पकडण्यात आले.
आरोपींनी सांगवी, पिंपरी, चिंचवड, निगडी, हिंजवडी, औंध, सुसगाव या भागात २५ घरफोडय़ा केल्याची कबुली दिली आहे. आरोपींकडे पॅशन प्रो ही मोटारसायकल होती. या मोटारसायकलवरून ते उच्चभ्रू सोसायटय़ांची पाहणी करीत. त्यानंतर संबंधित सोसायटीमध्ये मोठय़ा शिताफीने प्रवेश मिळवीत होते. इमारतीत प्रवेश मिळविल्यानंतर बंद सदनिका हेरून कटावणीच्या साहाय्याने कुलूप तोडीत होते.
आरोपींना अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता, त्यांना ३ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. गुन्हे शाखा अपर पोलीस आयुक्त शहाजी साळुंके, पोलीस उपायुक्त जयंत नाईकनवरे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील पवार, सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर तांदळे, हवालदार गुनसिलन रंगम, महेश पवार, अशोक गायकवाड, संजय गवारे, शशिकांत शिंदे, काळुराम रेणुसे, प्रतिक लाहीगुडे, धनंजय चव्हाण, राजू मोरे आदींनी ही कारवाई केली.

Story img Loader