लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: वनाज सहकारी गृह रचना संस्थेच्या माजी अध्यक्षांसह पदाधिकारी आणि दोन लेखा परिक्षकांनी अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अध्यक्षांसह पाच जणांच्या विरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी माजी अध्यक्ष दीपक चव्हाण, माजी सचिव नितीन सुर्वे, माजी खजिनदार प्रकाश सोलकर (सर्व रा. वनाज सोसायटी, कोथरूड), लेखा परिक्षक एम.आर. सलगर (रा. साडे सतरा नळी, हडपसर, पुणे) आणि लेखा परीक्षक धनश्री रत्नाळीकर (रा. पाषाण, पुणे) यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत लेखा परीक्षक प्रतिभा सुरेंद्र घोडके (वय ५१, रा. बिबवेवाडी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. संबंधित गुन्हा २०१४-१५ ते २०१८-१९ दरम्यान वनाज सहकारी संस्थेत घडला आहे.
हेही वाचा… “…म्हणून व्यंगचित्र काढत नाही”, राज ठाकरेंनी सांगितलं कारण; म्हणाले “भाषणातून…”
वनाज सहकारी गृह रचना संस्थेचे पदाधिकारी असताना ३३ लाख २२ हजार ३८७ रूपये रक्कमेचा अधिकारात बेकायदेशीर गैरवापर केला. त्यांनी या रक्कमेचा अपहार केला. संस्थेच्या अभिलेखावर असतानाही लेखा परीक्षण करणारे लेखा परीक्षक सलगर आणि रत्नाळीकर यांनी आर्थिक बाबी तसेच गैरव्यवहार लेखा परिक्षण अहवालात अपहारास सहायक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. कोथरूड पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.