पुणे : हडपसरमधील सय्यदनगर परिसरातील एका महिलेला धमकावून जमीन बळकाविणे, तसेच २० लाखांची खंडणी मागतिल्याप्रकरणी गुंड टिपू पठाण याच्यासह साथीदारांविरुद्ध काळेपडळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पठाण टोळीची हडपसरमधील सय्यदनगर भागात दहशत असून, यापूर्वी त्याच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याप्रकरणी टिपू पठाण, एजाज पठाण यांच्यासह दहाजणांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने काळेपडळ पोलसी ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेची सय्यदनगरमधील कल्पतरु सोसायटीत जमीन आहे. मोकळ्या जागेत एक पत्र्याचे शेड बांधण्यात आले आहे. जमिनीच्या कागदपत्रांत फेरफार करुन गुंड टिपू पठाणने महिलेची जमीन बळकाविण्याचा प्रयत्न केला. महिलेकडे २० लाख रुपयांची खंडणी मागितली. पठाणच्या धमकीमुळे घाबरलेल्या महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पठाण याच्यासह जमिनीचा बेकायदा ताब घेणे, तसेच खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमिते शेटे तपास करत आहेत.
टिपू पठाण टोळीची हडपसरमधील सय्यदनगर परिसरात दहशत आहे. यापूर्वी खुनाचा प्रयत्न, हाणामारी, दहशत माजविणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.
टिपू पठाणकडून नोटांची उधळण; पोलिसांकडून गुन्हा
गुंड टिपू पठाण याने सय्यदनगर भागातील एका कार्यक्रमात नोटांची उधळण केल्याची चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित केली होती. याप्रकरणी काळेपडळ पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, अशी माहिती काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांनी दिली. समाज माध्यमात दहशत माजविणाऱ्या चित्रफीत प्रसारित करणाऱ्या गुंड, तसेच साथीदारांविरुद्ध कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. आदेश धुडकावून काही गुंड समाज माध्यमात दहशत माजविणारी चित्रफीत प्रसारित करत असल्याचे आढळून आले आहे.