पुणे : सम-विषम दिनांक न पाहता (नो पार्किंग) रस्त्यावर लावलेल्या दुचाकीवर कारवाई केल्याने दाम्पत्याने डेक्कन वाहतूक विभागात गोंधळ घातला. पोलिसांना धक्काबुक्की करुन शिवीगाळ केली. याप्रकरणी दाम्पत्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कारवाई टाळण्यासाठी दाम्पत्याने दुचाकीच्या वाहन क्रमांक पाटीवर बनावट क्रमांक टाकल्याचे उघडकीस आले आहे.
याप्रकरणी गणेश कोंडीभाऊ सहाणे आणि त्याची पत्नी सोनम (दोघे रा. वाघेरे काॅलनी, मोरवाडी, पिंपरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत डेक्कन वाहतूक विभागातील सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद डोंगरे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाणे दाम्पत्याने नो-पार्किंगमध्ये वाहन लावल्याने वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. वाहन उचलून (टोईंग) डेक्कन वाहतूक विभागात आणण्यात आले. त्यानंतर सहाणे दाम्पत्य डेक्कन वाहतूक विभागात आले. त्यांनी रस्त्यावर गोंधळ घालून शिवीगाळ केली. सहायक निरीक्षक डोंगरे आणि सहकाऱ्यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दोघांनी तुमची नोकरी घालवते, अशी धमकी दिली.
सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहाणे दाम्पत्य वापरत असलेल्या दुचाकीला बनावट वाहन क्रमांक असलेली पाटी लावल्याचे चौकशीत उघडकीस आले. थकित दंडाची कारवाई टाळण्यासाठी त्यांनी बनावट वाहन क्रमांकाची पाटी लावल्याचे उघडकीस आले असून, सहायक पोलीस निरीक्षक केंद्रे तपास करत आहेत.