उंड्रीतील विबग्योर शाळेविषयी पालकांनी केलेल्या तक्रारीनंतर पाहणी करण्यासाठी गेलेल्या शिक्षण अधिकाऱ्याला शाळेच्या प्रवेशद्वारावर रोखून आत येण्यास मज्जाव करणाऱ्या शाळेतील दोन रखवालदारांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तनवीर आणि केवल अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या रखवालदारांची नावे आहेत. पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी ( प्राथमिक) मुश्ताक शेख यांनी यासंदर्भात कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रखवालदारांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उंड्रीतील विबग्योर शाळेतील काही पालकांच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या होत्या. शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी मुश्ताक शेख यांना शाळेला भेट देऊन पाहणी करण्याची सूचना दिली होती. पालकांनी प्रवेशशुल्कापोटी दिलेले धनादेश तसेच त्याची पोहोच पावती तपासणीच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
त्यानुसार पुढील कारवाई करण्यासाठी शुक्रवारी (२० मे) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास शेख शाळेत गेले. त्या वेळी तेथे असलेले रखवालदार तनवीर आणि केवल यांनी शेख यांना शाळेच्या आवारात येण्यास मज्जाव केला आणि शाळेचे प्रवेशद्वार बंद केले.
शेख यांनी त्यानंतर कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अद्याप याप्रकरणी रखवालदारांना अटक करण्यात आली नसून सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे तपास करत आहेत.