ब्राह्मण आणि सुवासिनी असल्याचे खोटे सांगून ब्राह्मण कुटुंबामध्ये सोवळ्याचा स्वयंपाक केल्याप्रकरणी पुण्यात एका महिलेवर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अशा विचित्र प्रकारात गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला. मात्र, फिर्यादी त्यांच्या मतावर ठाम राहिल्याने हा विरळात विरळा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. हवामान विभागाच्या माजी संचालिका डॉ. मेधा खोले यांनी याबाबत फिर्याद दिली होती. डॉ. खोले यांच्याघरी दरवर्षी गौरी-गणपती बसतात, त्याचप्रमाणे आई-वडिलांचे श्राद्धही असते. त्यासाठी त्यांना सोवळ्यामध्ये स्वयंपाक करणारी ब्राह्मण महिला हवी होती. २०१६ मधील मे महिन्यात त्यांच्याकडे एक महिला आली. तिने तिचे नाव निर्मला कुलकर्णी असे सांगितले. त्यानंतर संबंधित महिलेच्या घरीही खोले यांनी जाऊन चौकशी केली. तेथेही तिने आपण ब्राह्मण असल्याचे सांगितले. या महिलेने खोले यांच्या घरी २०१६ बरोबरच यंदाही गौरी-गणपती आणि आई- वडिलांच्या श्राद्धाच्या विधीचा सोवळ्यात स्वयंपाक केला. मागील दोन वषार्ंमध्ये संबंधित महिलेने सहा वेळा अशा प्रकारे खोले यांच्याकडे स्वयंपाक केला.
खोले यांच्याकडे पूजेसाठी येणाऱ्या गुरुजींनी संबंधित महिला ब्राह्मण नसल्याचे खोले यांना सांगितले. त्यामुळे पुन्हा खोले यांनी महिलेच्या घरी जाऊन सखोल चौकशी केली, त्या वेळी ती ब्राह्मण आणि सुवासिनी नसल्याचे समजले. आमच्या घरी सोवळ्यासाठी सुवासिनी ब्राह्मण महिलाच आवश्यक असते. असे असताना तुम्ही खोटे का सांगितले, अशी विचारणा खोले यांनी महिलेकडे केली. त्यामुळे काय होते, असे प्रश्न संबंधित महिलेने विचारले आणि ती त्यांच्या अंगावर धावून आली. तिने धार्मिक भावना दुखावल्या, १५ ते २० हजारांचे नुकसान केल्याचे खोले यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
खोले यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संबंधित महिलेवर भारतीय दंडविधान संहिता कलम ४१९ (फसवणूक), कलम ३५२ (हल्ला करणे) आणि कलम ५०४ (धमकी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.