पोलिसांचा दरारा नाही; राजकीय हस्तक्षेप, संगनमतामुळे आरोपींवर कारवाई होत नसल्याचा आरोप 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू करण्यास राज्य शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर याबाबतची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, खऱ्या अर्थाने पोलीस आयुक्तालयाचे काम सुरू होण्यासाठी आणखी बराच कालावधी जाणार आहे. तोपर्यंत सध्याच्या वाढत्या गुन्हेगारीचे काय, याची धास्ती सर्वसामान्यांना आहे. शहरात दररोज वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे होत आहेच, त्यात हाणामाऱ्या आणि तोडफोडीच्या घटनांना पायबंद बसण्याची चिन्हे नाहीत. पोलिसांचा दरारा नाही, संगनमत असल्याने पोलीस कारवाई करत नाहीत आणि एखादा पोलीस प्रामाणिकपणे कारवाई करू म्हणालाच, तर त्यात राजकीय हस्तक्षेप होण्याची शक्यताच अधिक असते, अशी परिस्थिती आहे.

पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू व्हावे, अशी शहरवासीयांची जुनी मागणी होती. त्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी बराच पाठपुरावा केला. अखेर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तिक लक्ष घातल्यानंतर पिंपरीच्या आयुक्तालयाला मंजुरी मिळाली. नव्याने २६३३ पदे पिंपरीसाठी मंजूर करण्यात आली. त्यामुळे पुढील काळात पिंपरीतील पोलिसांचे बळ निश्चितपणे वाढणार आहे, त्याचा उपयोग गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी होणे शक्य होणार आहे. एक मे पासून पोलीस आयुक्तालय सुरू करण्याचा प्रयत्न होता. मात्र, तांत्रिकदृष्टय़ा ते शक्य नसल्याचे दिसून येते. त्यामुळे आयुक्तालयाची घोषणा झाली, तरी अंमलबजावणी तूर्त लांबणीवर पडणार आहे. तोपर्यंत शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांना आळा घालण्याची गरज असून त्यासाठी तातडीने कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

रविवारी भल्या सकाळी खराळवाडी येथील संतोष चांदेरे या दूध विक्रेत्याला मारहाण करून त्याच्याकडील सव्वालाखाची रक्कम चारचाकी वाहनातून आलेल्या दोन जणांनी लुबाडून नेली. आरोपींची ओळख पटली व त्यांना ताब्यात घेण्यात आले. मात्र, कारवाई सुरू होण्यापूर्वीच त्यांना वाचवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास खराळवाडी येथे ४० ते ५० जणांच्या टोळक्याने धिंगाणा घालत रस्त्यावर लावलेल्या मोटारी फोडल्या. यामध्ये बहुतांशी मुले १३ ते १५ वयोगटातील होती. विशेष म्हणजे शाळकरी मुलांचा सहभाग त्यामध्ये होता. वाहने फोडण्यासारखे काहीही कारण नव्हते. पिंपरीतील बौद्धनगर येथे मिरवणुकीत ध्वनिवर्धक यंत्रणेवर उभे राहून नाचू न दिल्याच्या कारणावरून एका तरुणाला मारहाण करण्यात आली. रहाटणीत पाच जणांच्या टोळक्याने एका तरुणास बेदम मारहाण केली. कासारवाडीत वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या वादात शिवी का दिली, याचा जाब विचारणाऱ्या तरुणाच्या डोक्यात बीअरची बाटली फोडण्यात आली. या घटना गेल्या दोन दिवसांतील आहेत. या आणि यासारख्या घटना सातत्याने होत आहेत. शक्य तिथे पोलीस कारवाई करत आहेत. काही ठिकाणी पोलिसांचे संगनमतही दिसून येते. आणि जर पोलीस प्रामाणिकपणे एखाद्या प्रकरणात काम करत असतील, तर तेथे राजकीय हस्तक्षेप होतो. अशा कारणांमुळे गुन्हेगारांचे फावते व त्यातून त्यांचा उच्छाद दिसून येतो.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime increasing in pimpri chinchwad city due to political interference