तळेगाव रेल्वे स्थानकावर लाल रंगाच्या प्रवासी बॅगेत सापडलेल्या युवतीच्या खून प्रकरणी लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुंबईतील तिघांना अटक केली आहे. अटक केलेले आरोपीपैकी एक जण सराईत गुन्हेगार असून त्यांला आर्थिक गुन्ह्य़ात मदत करण्यात नकार दिल्यामुळे त्याच्या सांगण्यावरून युवतीचा इतर दोघांनी ओढणीने गळा आवळून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. बॅगेतच सापडलेल्या मोबाइलच्या सीमकार्डवरून लोहमार्ग पोलिसांनी आरोपीचा माग काढत ४८ तासांत त्यांना गजाआड केले.
राहुल रवींद्र बरई (वय २१), ईशान हमजान अली कुरेशी (वय २१, रा. दोघेही- अॅन्टॉप हिल, वडाळा मुंबई) आणि संतोष विष्णू जुगदर (वय ३१, रा. वडाळा मुंबई) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. संतोष याच्या सांगण्यावरून बरई आणि कुरेशी यांनी हा खून केल्याचे तपासात समोर आले आहे, अशी माहिती पुणे लोहमार्ग विभागाचे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी दिली.
पानसरे यांनी सांगितले, की तळेगाव रेल्वे स्थानकावर बुधवारी सकाळी प्रवासी बॅगेत एका पंधरा ते सतरा वयोगटातील युवतीचा मृतदेह आढळून आला होता. त्या ठिकाणी रेल्वेचे पोलीस निरीक्षक अभय परमार व इतर वरिष्ठ अधिकारी पोहचले. त्या वेळी त्यांना घटनास्थळी काही महत्त्वाचे दुवे सापडले होते. त्यानुसार लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके करून आरोपींच्या मागावर लावली. रेल्वे पोलीस निरीक्षक अरुण मोरे यांच्या पथकाला नालासोपारा येथे बरई आणि कुरेशी हे दोन आरोपी मिळाले. त्यांच्याकडे तपास केल्यानंतर संतोषच्या सांगण्यावरून त्यांनी हा खून केल्याचे सांगितले. या गुन्ह्य़ातील मुख्य आरोपी संतोष आणि मयत युवती वडाळा येथे एकाच भागात राहतात. मात्र, संतोष हा विवाहित असल्यामुळे त्याने या युवतीस नालासोपारातील सदनिकेवर ठेवले होते. संतोष हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर चोरी आणि खुनाचा गुन्हा दाखल आहे. संतोष याने संबंधित युवतील आर्थिक स्वरूपाच्या गुन्ह्य़ात मदत करण्यास सांगितले. मात्र, तिने नाकार दिल्यामुळे संतोषने बरई आणि कुरेशा यांना खून करण्यास सांगितले. त्या दोघांनी युवतीचा ओढणीने गळा दाबून खून केला, असे पानसरे यांनी सांगितले.
अशी ठेवली बॅग; आरोपींचा लागला माग
नालासोपारा येथील सदनिकेत दोघांनी या युवतीचा मंगळवारी रात्री ओढणीने गळा आवळून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह एका प्रवासी बॅगेत भरून टॅक्सीतून वडाळा येथे गेले. या ठिकाणी संतोष याने ती मेल्याची खात्री केल्यानंतर हा मृतदेह टाकण्यासाठी एखादा निर्मनुष्य भाग म्हणून तळेगाव रेल्वे स्थानकाची निवड केली. त्यानुसार दोघे जण कॅब करून तळेगाव येथे आले. त्या ठिकाणाहून रिक्षाने पहाटे रेल्वे स्थानकावर गेले. त्या ठिकाणच्या स्वच्छता गृहाजवळ बॅग उभी करून ते पसार झाले. पोलिसांना बॅग मिळाल्यानंतर त्यामध्येच या युवतीचे सीमकार्ड सापडले. त्या सीमकार्डवरून झालेल्या फोनवरून या आरोपींचा माग काढण्यात आला. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सुरुवातीस दोघांना अटक करून मुख्य आरोपीला पकडले. या आरोपींना १३ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
गुन्ह्य़ात मदत करण्यास नकार दिल्यामुळे युवतीचा खून!
आरोपीपैकी एक जण सराईत गुन्हेगार असून त्यांला आर्थिक गुन्ह्य़ात मदत करण्यात नकार दिल्यामुळे त्याच्या सांगण्यावरून युवतीचा इतर दोघांनी ओढणीने गळा आवळून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-05-2014 at 02:55 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime murder arrested mobile sim card