Crime News स्वारगेट या ठिकाणी बसमध्ये एका मुलीवर बलात्कार झाल्याचं प्रकरण ताजं असतानाच पुण्यातल्या शिरुर तालुक्यातील एका गावात एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पुणे पोलिसांनी सोमवारी या घटनेबाबत माहिती दिली आहे. १ मार्चला चाकूचा धाक दाखवून या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी अमोल पोटे, श्रीगोंदा आणि किशोर काळे बीड या दोघांना अटक केली आहे.
पोलिसांनी या घटनेबाबत काय सांगितलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी किशोर काळे हा ड्रायव्हर म्हणून काम करतो तर अमोल पोटे हा आरोपी मजूर म्हणून काम करतो. या दोघांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. कोर्टाने या दोघांनीही सात मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटना काय ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १९ वर्षांची तरुणी मध्य प्रदेशातून तिच्या नातेवाईकांकडे पुण्यातल्या शिरुरमध्ये आली होती. रात्री ११ च्या सुमारास या तरुणीला काळे आणि पोटे या दोघांनी गाठलं. हे दोघंही त्यावेळी दुचाकीवरुन येत होते. यावेळी या दोघांनी पीडितेला चाकूचा धाक दाखवला आणि तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. एवढंच नाही तर तिचा जो नातलग तिच्याबरोबर उभा होता त्या दोघांचे आक्षेपार्ह अवस्थेतले फोटो आणि व्हिडीओ या दोघांनी काढले. त्या दोघांना तसं करण्यास या दोन्ही आरोपींनी भाग पाडलं होतं. कुणाला बोलशील तर तुला ठार करु अशीही धमकी या दोघांनी सदर मुलीला दिली होती. तसंच तुझ्या नातलगाला आम्ही ठार करु अशीही धमकी दिली. तिच्या अंगावर असलेले सोन्याचे दागिने आणि तिच्याकडे असलेले पैसे घेऊन या दोघांनी पळ काढला.
पोलिसांनी घटनास्थळी तातडीने घेतली धाव
पोलिसांना जेव्हा सदर घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पंकज देशमुख यांनीही या ठिकाणी भेट दिली आणि काय गुन्हा घडला याची सविस्तर माहिती घेतली. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे. या प्रकरणात २ मार्चला FIR दाखल करण्यात आला अशीही माहिती समोर आली आहे. पीडित मुलगी तिच्या नातलगाशी बोलत उभी होती त्यावेळी दोघे जण आले आणि त्यांनी या दोघांनाही चाकूचा धाक दाखवला आणि पीडितेवर बलात्कार केला. तसंच तिच्या नातलगाला जीवे मारण्याची धमकी दिली. पुण्यातल्या स्वारगेट सारख्या ठिकाणी एक घटना घडलेली असताना आता पुण्यातल्या शिरुर तालुक्यातही अशीच घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांनाही अटक केली आहे.