पुणे-सातारा महामार्गावर शिंदेवाडीजवळ पाण्याच्या प्रवाहत वाहून माय-लेकीच्या मृत्यूप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात किसन राठोड आणि पंडित राठोड या दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी दिली. ही दुर्घटना जून महिन्यात घडली होती. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच राठोडच्या शिंदेवाडी येथील जमिनीचा पुन्हा एकदा लिलाव झाला. मात्र, त्यासाठी कोणीही बोली न लावल्याने ती सरकारनेच नाममात्र दरात ताब्यात घेतली.
पुणे-सातारा मार्गावर कात्रजच्या नवीन बोगद्याजवळील शिंदेवाडी येथे जून महिन्यात पावसामुळे दुर्घटना झाली होती. त्या पावसात रस्त्यावरून पाण्याचा मोठा लोंढा वाहिल्याने वाडेकर कुटुंबीयांची मोटार वाहून गेली. त्यात माय-लेकींचा मृत्यू झाला होता. या घटनेत आठ दिवसांनंतर संस्कृतीचा मृतदेह सापडला होता. या दुर्घटनेला राठोड बंधू जबाबदार असल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत उपविभागीय अधिकाऱ्याने केलेल्या चौकशीत या प्रकाराला कात्रज टेकडी फोडणे जबाबदार ठरल्याचे म्हटले आहे. ही फोडाफोड केल्यामुळे राडारोडा खाली आला. तसेच, पाण्याचा जास्त प्रवाह रस्त्यावर आला, असे म्हटले आहे. ही तोडफोड राठोड बंधूंनी केली होती. त्यामुळे दोघी माय-लेकींच्या मृत्यूस ते कारणीभूत झाल्याचा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्याविरुद्ध  दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अहवाल आल्यानंतर राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, असे परदेशी यांनी सांगितले. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा