निवडणुकीची डय़ूटी सुरू असल्याचे सांगून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांनी ‘पुणे वृत्तान्त’मधील वृत्ताची दखल घेऊन तातडीने गुन्हा दाखल केला आणि तपासही सुरू केला. याबाबत बँकेकडून तपासासाठी माहिती घेण्यात येत आहे, तर धनादेश घेऊन जाणाऱ्या आरोपीचे छायाचित्र सीसीटीव्ही चित्रीकरणाद्वारे मिळविण्यात येत आहे.
पुण्यातील विनायक कुलकर्णी यांची एका मोठय़ा बँकेचे प्रतिनिधी असल्याचे सांगणाऱ्या तिघांनी नुकतीच फसवणूक केली. गृहकर्ज देण्याच्या नावाखाली प्रोसेसिंग फी म्हणून २४,९०० रुपयांचा धनादेश वैयक्तिक खात्यात जमा करून ही फसवणूक करण्यात आली होती. ते प्रभात पोलीस चौकी येथे तक्रार देण्यासाठी गेलेले असताना त्यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले. तेथे त्यांनी तक्रार अर्ज दिला, तरी पोलिसांनी सध्या निवडणूक डय़ूटी असल्याचे सांगून गुन्हा दाखल केला नाही. या गुन्ह्य़ाचा लगेच तपास झाला, तर आपली गेलेली रक्कम परत मिळेल, अशी कुलकर्णी यांची अपेक्षा होती. मात्र, पोलिसांच्या निवांतपणामुळे तपास तर लांबच राहिला, साधा गुन्हाही दाखल झाला नाही. पुणे शहरात तातडीने गुन्हे दाखल होतात, असे पोलीस आयुक्त सतीश माथूर जाहीरपणे सांगतात. प्रत्यक्षातच मात्र कुलकर्णी यांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ झाल्याचे वृत्त बुधवारी ‘पुणे वृत्तान्त’मध्ये प्रसिद्ध झाले.
यानंतर डेक्कन ठाण्याच्या पोलिसांनी बुधवारी सकाळी कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला. त्यांना बोलावून घेऊन त्यांच्या माहितीनुसार तातडीने गुन्हा दाखल केला. याबाबत डेक्कन पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुचेता खोकले यांनी सांगितले, की गुन्ह्य़ाचा तपास सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी धनादेश ज्या व्यक्तीच्या खात्यावर जमा झाला, त्या खात्याचे तपशील बँकेकडून मागविण्यात आले आहेत. याशिवाय ज्या व्यक्तीने कुलकर्णी यांच्याकडून धनादेश नेला, त्याचे छायाचित्र मिळविण्यासाठी सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेण्यात येणार आहे. त्यावरून या गुन्ह्य़ाचा तपास केला जाईल. 

Story img Loader